ग्रीन फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी घेतली महाराजांची सदिच्छा भेट
शिर्डी प्रतिनिधी:
वारकरी संप्रदायाची तेजस्वी परंपरा जपत आणि संत एकनाथ महाराजांच्या भेटीची ओढ उराशी बाळगून, प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिर्डी ते पैठण अशा भव्य 'श्री विश्वसंत साईबाबा पायी रथ पालखी दिंडी सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे २० वे वर्ष असून, पैठण येथील श्री शांतीब्रम्ह एकनाथ महाराज समाधी उत्सव (षष्ठी) निमित्त हा सोहळा आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर आज ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार तुषार महाजन यांनी सोहळ्याच्या आयोजकांची आणि महाराजांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सोहळ्याच्या भव्य नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली आणि २० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या.
श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते आणि प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे शिर्डी ते पैठण हा मार्ग भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. मंगळवारी, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर महाराज मंदिर, शिर्डी येथून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या नऊ दिवसांच्या पायी वारीमध्ये भाविकांच्या सोयीसाठी अन्नदान आणि निवासाचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. दिंडीचा मुक्काम अनुक्रमे निघोज, चितळी, भोकर फाटा, नेवासा बु।।, वस्तीपूर, राक्षसभुवन (शनि मंदिर) असा करत ९ मार्चला पालखी पैठण येथे पोहोचेल. त्यानंतर ११ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होईल आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
या सोहळ्यासाठी ह.भ.प. विश्वास महाराज दामले यांचे मार्गदर्शन लाभले असून, व्यवस्थापक म्हणून ह.भ.प. साहेबराव रंगनाथ पा. मते, तसेच ह.भ.प. अशोक महाराज आहेर, बाळासाहेब कारभारी पा. खरात, लहु महाराज, शहाजी वाणी, गणेश गिरनार, कानिफनाथ खरात आणि उत्तमराव आईर हे प्रमुख पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दरम्यान, तुषार महाजन यांच्या भेटीवेळी वारकरी संप्रदायातील शिस्त आणि पर्यावरण रक्षण यावरही चर्चा झाली. तरी या विसाव्या वर्षी पदार्पण करणाऱ्या भव्य पायी पालखी सोहळ्यात आणि रथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था व साईसेवा राईज ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

