स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या हस्ते प्रकल्पाची माहिती; वारकरी संप्रदायासाठी उभे राहणार भव्य भक्तनिवास आणि संस्कार केंद्र
शिर्डी प्रतिनिधी:
वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत भक्ती आणि समाजसेवेचा एक भव्य प्रकल्प आकारास येत आहे. येथील 'श्री हरिपाठ आश्रम दत्त मंदिर ट्रस्ट' च्या वतीने सुमारे १ कोटी ५० लाख रुपये खर्चून जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि भव्य 'संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर' उभारण्यात येणार आहे. या नियोजित भव्य प्रकल्पाच्या ठिकाणी आज ग्रीन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि पत्रकार तुषार महाजन यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी तुषार महाजन यांनी आश्रमाचे संस्थापक व अध्यक्ष श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि नियोजित प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
असा असेल भव्य प्रकल्प:
हरिपाठ आश्रमाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात जुन्या मंदिराचा कायापालट केला जाणार आहे. मंदिराच्या ५० बाय ४० फुटांच्या जागेत भव्य सभामंडप आणि शिखरासह सुसज्ज वास्तू उभारली जाईल. या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि साईबाबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
या भेटीदरम्यान स्वामीजींनी माहिती दिली की, केवळ मंदिरच नाही, तर वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लांबून येणाऱ्या भाविकांसाठी या संकुलात 'भक्तनिवास' आणि 'भोजनालय' देखील उभारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना येथे मोफत निवास आणि भोजनाची व्यवस्था असेल, ज्यामुळे वारकरी संप्रदायाचा वारसा पुढील पिढीकडे नेण्याचे पवित्र कार्य येथे घडणार आहे.
तुषार महाजन यांच्याकडून कार्याचे कौतुक:
प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकार तुषार महाजन यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. "आजच्या काळात धर्मासोबतच समाजसेवा आणि शिक्षण यांचा मेळ घालणारे प्रकल्प उभे राहणे काळाची गरज आहे. त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा आश्रम एक आधारवड ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दानशूर भाविकांनी रोख स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात मदत करून या ईश्वरी कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

