सोमवारपासून प्रारंभ; मोफत उपचार व शस्त्रक्रियेची रुग्णांना सुवर्णसंधी
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
ग्रामीण भागातील रुग्णांना अद्ययावत आणि दर्जेदार आयुर्वेदिक उपचार मिळावेत, या उदात्त हेतूने आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील मांचीहिल परिसरातील अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने ४५ दिवसीय भव्य 'महाआरोग्य शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ पासून या शिबिरास प्रारंभ होत असून, १ एप्रिल २०२६ पर्यंत हे शिबीर अविरत सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
हे शिबीर दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत रुग्णांसाठी खुले राहणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा स्वरूपात आणि अनेक महत्त्वाचे उपचार चक्क मोफत उपलब्ध करून देणे, हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये:
* मोफत शस्त्रक्रिया: मूळव्याध आणि भगंदर यांसारख्या त्रासदायक आजारांवर विनामूल्य शस्त्रक्रिया केली जाईल.
* पंचकर्म उपचार: शरीराच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत प्रभावी असलेले पंचकर्म उपचार पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.
* विविध तपासण्या: डोळ्यांची मोफत तपासणी, तसेच त्वचारोग आणि केसांच्या समस्यांवर मोफत सल्ला व उपचार उपलब्ध असतील.
* विशेष विभाग: स्त्रियांच्या विविध समस्या आणि बालरोग यावर विशेष मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
* औषधे: डॉक्टरांनी सुचविलेली औषधे अत्यंत नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रुग्णांवर अचूक उपचार व्हावेत यासाठी हॉस्पिटलमधील विविध विशेष विभाग सज्ज झाले आहेत. यामध्ये कायचिकित्सा, पंचकर्म विभाग, नेत्ररोग, शल्यतंत्र (सर्जरी), स्त्रीरोग व प्रसुती विभाग, बालरोग, स्वस्थवृत्त आणि शालाक्य विभाग यांचा समावेश आहे. प्रत्येक विभागात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असेल.
दीर्घकाळ त्रास देणारे जुने आजार, सांधेदुखी, पचनाचे विकार, त्वचाविकार आणि इतर गंभीर समस्यांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावी उपचार शक्य आहेत. संगमनेर तालुक्यासह आश्वी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम राबविला जात असून, गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

