वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) :- अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कुताळमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व ज्ञानाची कक्षा विस्तारावी या उद्देशाने शाळेत सुसज्ज असे पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका दिपस्वी पवार तसेच क्रियाशील उपक्रम सहशिक्षिका पल्लवी गटगळ यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रंथालय उभारणीसाठी शिक्षिका व पालकांनी मोलाची मदत केली. ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यासाठी ओळखली जाते. अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून नियमित वाचन उपक्रम व मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू पिंपरकर, उपाध्यक्ष सौ. सारिका नितीन कुताळ, शिक्षण तज्ञप्रेमी संजय भापकर तसेच दिपाली कुताळ, साक्षी कुताळ, स्वाती कुताळ, विजय कुताळ, अश्विनी येठेकर, दत्तात्रय कुताळ, ज्योती भापकर, नितीन कुताळ आणि अर्जुन कुताळ उपस्थित होते.
शाळेच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांकडून स्वागत करण्यात येत असून, कुताळमळा जिल्हा परिषद शाळेने उभारलेले आधुनिक व सुसज्ज ग्रंथालय इतर शाळांसाठी आदर्श ठरत आहे.

