चेअरमन विठ्ठल पवारांची अनोखी संकल्पना; 'श्री साई संस्थान सोसायटी'चा भव्य उपक्रम
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी येथील ऐतिहासिक अशा 'शिर्डी परिक्रमा महोत्सवा'ची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा या सोहळ्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीने एक अभिनव पाऊल उचलले आहे. सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत तब्बल २४ हजार वाहनांवर शिर्डी परिक्रमेचे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. या 'स्टिकर मोहिमे'मुळे आता देशभरात साई परिक्रमेचा संदेश पोहोचणार आहे.
विठ्ठल पवारांची 'मोबाईल जाहिरात' संकल्पना
दरवर्षी १३ फेब्रुवारीला होणारा शिर्डी परिक्रमा सोहळा आता भव्य दिव्य स्वरूप धारण करत आहे. या सोहळ्याची माहिती कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाने एक वेगळी शक्कल लढवली आहे. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या वाहनांवर 'शिर्डी परिक्रमा महोत्सव २०२६' चे आकर्षक स्टिकर्स लावण्यात येत आहेत. जेव्हा ही वाहने परत आपल्या गावी जातील, तेव्हा त्यांच्या माध्यमातून परिक्रमेचा संदेश आपोआप देशभर फिरणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण
या अभिनव उपक्रमाचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख आणि सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"सोसायटीचे योगदान अभिनंदनीय" - CEO गाडीलकर
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, "शिर्डी परिक्रमा महोत्सवासाठी श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. भक्तांच्या वाहनांवर स्टिकर लावल्यामुळे बाबांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार-प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठी मी चेअरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."
शिर्डीकरांनाही सहभागी होण्याचे आवाहन
'ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन'च्या वतीने यावेळी शिर्डीतील इतर व्यावसायिक आणि ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले. प्रत्येकाने आपापल्या व्यवसायाचे नाव टाकून अशा प्रकारचे स्टिकर्स छापावेत आणि जास्तीत जास्त वाहनांवर लावून या धर्मकार्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१३ फेब्रुवारीला होणाऱ्या या महासोहळ्यासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली असून, या 'स्टिकर मोहिमे'मुळे उत्सवात आणखीच रंगत भरली आहे.

