shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“रोगापेक्षा इलाज भारी!” — वडार महामंडळाच्या कर्ज योजनांवर अनंत अटींचा बोजा; वडार समाजाला उद्योजक बनवण्यासाठी सरकार पुढे येणार का?

लातूर | प्रतिनिधी :
वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वडार महामंडळाकडून एक लाख रुपयांच्या कर्जासाठीही अत्यंत किचकट अटी व नियमांची अडचण निर्माण होत असल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, इतर महामंडळांमध्ये वयोमर्यादा 60 वर्ष असताना पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळासाठी केवळ 55 वर्षांची मर्यादा ठेवण्यात आल्याने स्पष्ट दुजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कर्ज देण्याच्या नावाखाली प्रचंड प्रक्रिया, कागदपत्रांची मागणी, तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकांवर अनेक जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार टाकल्यामुळे आणि त्यांच्या कामातील अनास्थेमुळे प्रकरणांना मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. परिणामी, “रोगापेक्षा इलाज भारी” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी तक्रार भटक्या-विमुक्त समाजाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वडार समाजातील अनेक युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक असतानाही कर्ज मिळत नसल्यामुळे हताश होत आहेत. शासनाच्या योजना प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याची भावना दिवसेंदिवस तीव्र होत असून, “योजना आहेत, पण त्या मिळवण्यासाठी मार्गच बंद आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.
एक लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी जामीनदारांची अट, उत्पन्नाचे दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि वारंवार कार्यालयीन फेऱ्या यामुळे सामान्य कष्टकरी कुटुंबातील युवकांसाठी ही योजना प्रत्यक्षात अप्राप्य ठरत आहे. परिणामी, शासनाच्या उद्योजकता विकासाच्या उद्दिष्टालाच तडा जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
पारंपरिकदृष्ट्या कष्टकरी असलेला वडार समाज योग्य संधी मिळाल्यास उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतो. मात्र, कर्ज योजनांमधील अडथळ्यांमुळे समाजातील युवकांची स्वप्ने अधांतरी राहिली आहेत.
आज वडार समाजाचा ठाम सवाल आहे — सरकार खरोखरच वडार समाजाला उद्योजक बनवू इच्छित आहे का?
जर इच्छित असेल, तर कर्ज योजनांमधील अनावश्यक अटी कमी करून सुलभ, पारदर्शक आणि तात्काळ कर्ज वितरणाची व्यवस्था का केली जात नाही?
समाजातील तरुणांना नोकरीच्या प्रतीक्षेत ठेवण्याऐवजी स्वरोजगारासाठी सक्षम करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून वडार महामंडळाच्या कर्ज प्रक्रियेत सुधारणा करावी आणि वडार समाजातील युवकांना सुलभ कर्जपुरवठा करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी समाजातून होत आहे.
अन्यथा, या योजना केवळ कागदावरच राहतील आणि वडार समाजाचा विकास पुन्हा एकदा आश्वासनांपुरताच मर्यादित राहील, अशी तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.
०००००
close