shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थानच्या महाप्रसाद किराणा खरेदीत मोठा गैरव्यवहार? माहिती अधिकारातून धक्कादायक दावा; निकृष्ट माल पुरवठ्याचा आरोप

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:- 
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मधील महाप्रसादासाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या किराणा खरेदीत मोठा गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संजय बबुताई भास्करराव काळे यांनी केला असून, या प्रकरणामुळे संस्थान प्रशासनात खळबळ उडाली आहे. दररोज हजारो साईभक्त जे महाप्रसाद ग्रहण करतात, त्या अन्नाच्या गुणवत्तेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थानच्या प्रसादालयात दररोज सरासरी ४० हजारांहून अधिक भाविक महाप्रसादाचे सेवन करतात. यासाठी वर्षाकाठी अंदाजे ७० ते १०० कोटी रुपयांचा किराणा माल खरेदी केला जातो. मात्र, प्रत्यक्ष पुरवठा होणारा माल आणि निविदेमध्ये मंजूर केलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

माहिती अधिकारातून नमुने तपासणी
दि. ७ मे २०२६ रोजी माहितीच्या अधिकारातून संजय काळे यांनी संस्थानच्या भांडार व खरेदी विभागाला भेट देत प्रसादालयातील गहू, तांदूळ, डाळी, काजू, किसमिस, लवंग, हरभरे, छोले आदी तब्बल १७ प्रकारच्या किराणा मालाचे नमुने स्वतंत्र पिशव्यांमध्ये घेतले. विशेष म्हणजे, कोणत्या गोणीतून नमुने घ्यायचे याचे स्वातंत्र्य संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच देण्यात आले होते.
यानंतर हे नमुने खरेदी विभागात दाखवण्यात आले. तिथे ठेकेदारांनी सादर केलेल्या नमुना बरण्यांतील माल आणि प्रत्यक्ष वापरात असलेला माल यामध्ये मोठा फरक आढळल्याचा दावा करण्यात आला. बरण्यांतील नमुने “अ” दर्जाचे असताना, प्रत्यक्षात वापरला जाणारा माल “क” दर्जाचा असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

अ” दर्जाचे बिल, “क” दर्जाचा माल?
संजय काळे यांनी आरोप केला की, काही ठेकेदार उच्च प्रतीच्या मालाचे दर आकारून प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचा किराणा पुरवठा करत आहेत. त्यामुळे संस्थानची आर्थिक फसवणूक होत असून, साईभक्तांच्या आरोग्याशी देखील खेळ केला जात असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे.
विशेष म्हणजे, संस्थान अन्न व औषध प्रशासन विभागाकडून “खाण्यास योग्य” असल्याचे प्रमाणपत्र घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, निविदेमध्ये नमूद केलेल्या दर्जानुसारच मालाचा पुरवठा झाला आहे का, याची स्वतंत्र खातरजमा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाला दिले निवेदन
या संदर्भात प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले यांना दोन्ही नमुने दाखवून तक्रार करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनाही संपूर्ण बाब निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंचनामा करून नमुने देण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न
महाप्रसाद हा लाखो साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या किराण्याचा वापर होत असल्याचे आरोप अत्यंत गंभीर मानले जात आहेत. यामुळे संस्थान प्रशासनाच्या खरेदी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.

चौकशी होणार का?
साईभक्तांच्या देणगीतून चालणाऱ्या संस्थानमध्ये जर दर्जाहीन मालाचा पुरवठा होत असेल, तर त्याला जबाबदार कोण? खरेदी प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, बिल मंजुरी आणि पुरवठा यामध्ये कोणत्या स्तरावर त्रुटी राहिल्या? याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात संस्थान प्रशासन किंवा संबंधित ठेकेदारांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असली तरी, माहिती अधिकारातून समोर आलेल्या या दाव्यांमुळे शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
०००
close