अहिल्यानगर, दि. 18 जून 2026 : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई भासत असून त्यांच्यासाठी तातडीने कृत्रिम पाणवठे निर्माण करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे यांनी वनविभागाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी नगर तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील देहरे गाव परिसर, गोरक्षनाथ पायथा तसेच वनविभागाच्या हद्दीतील नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून ते मानवी वस्तीकडे वळत आहेत. परिणामी वन्यजीव आणि मानव यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे.
निवेदनाद्वारे वनविभागाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
- वनक्षेत्रातील आवश्यक ठिकाणी तातडीने कृत्रिम पाणवठे (वॉटर होल्स) तयार करावेत.
- अस्तित्वात असलेल्या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करावी.
- शक्य असल्यास डोंगराळ भागात सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
या उपक्रमासाठी परिसरातील युवक व स्वयंसेवक श्रमदानासह पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महेश काळे यांनी व्यक्त केली आहे.
०००

