*श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय, इंदापूर* येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा..
इंदापूर: संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा साहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली या संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या प्रसिद्ध योगशिक्षिका सौ. सायरा हमीदभाई आत्तार आणि योग प्रशिक्षक चंद्रकांत देवकर, देवराव मते यांनी उपस्थितांना योगासनांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून घेतली. रोजच्या जीवनात योगाचा समावेश केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे उत्तम राहते, याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
योग साधना झाल्यानंतर शालेय परिसरात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत देवकर (नाना), अशोक अनपट (नाना) आणि हमीदभाई आतार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची रोपे लावून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके झाले असून, विद्यार्थ्यांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला. इंदापूर परिसरात या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

