shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला अहिल्यानगरात उत्स्फूर्त प्रतिसादगोसेवा, गोसंवर्धन आणि सामाजिक समरसतेचा भव्य संगम



अहिल्यानगर / श्रीरामपुर  प्रतिनिधी

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यमाता गोमाता संवाद यात्रा – महाराष्ट्र राज्य” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मंगळवार दि. २३ जून रोजी ही यात्रा अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सोमवार दि. २२ जून रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातून प्रारंभ झालेल्या या संवाद यात्रेचे अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर हॉटेल संजोग, मनमाड रोड येथे भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, अहिल्यानगर, गोशाळा महासंघ अहिल्यानगर आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे माननीय नामदार शेखरजी मुंदडा साहेब मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास गोशाळा संचालक, गोपालक, पशुपालक, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डी-मार्ट चौक ते हॉटेल संजोग या मार्गावर भव्य गोरथ शोभायात्रा काढण्यात आली. श्री रुख्मिणी माता गोशाळा, राशीन यांच्या पुढाकाराने आयोजित या शोभायात्रेत श्री दत्त योगीराज आश्रमाचे ह.भ.प. रवींद्र महाराज सुदरीक यांच्या वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
गोमाता पूजन, श्रीगोपालकृष्ण पूजन, दीपप्रज्वलन आणि गोमाता आरतीनंतर माननीय शेखरजी मुंदडा साहेब यांच्या शुभहस्ते संवाद यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोसंवर्धन, देशी गाईंचे महत्त्व, जैविक शेती, गोशाळांचे व्यवस्थापन, पशुपालकांच्या समस्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात गोमयापासून तयार करण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक आणि उपयुक्त वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. गोमयापासून बनविलेल्या स्मृतिचिन्हे आणि घड्याळे देऊन मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या संवाद यात्रेत श्रीरामपूर परिसरातील विविध सेवाभावी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तसेच तृतीयपंथी समाजाच्या पिंकी गुरु यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक समरसता आणि गोसेवेच्या संदेशाला बळकटी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महा एनजीओ फेडरेशनचे श्री मुकुंद अण्णा शिंदे व श्री राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक सुरज सूर्यवंशी, अवधूत कुलकर्णी, प्रसन्न धुमाळ, रामपाल पांडे, अरुण गायकवाड आणि संचित अदिक यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील अनेक सामाजिक, सेवाभावी आणि जनकल्याणकारी संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अहिल्यानगर डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे आणि डॉ. संतोष पालवे  श्री सूरज सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. महेश पारखे यांनी केले. शेवटी गोशाळा महासंघ, अहिल्यानगरचे सचिव गौतमजी कराळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, गोशाळा संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.
राष्ट्रगीत आणि “गोमाता की जय” च्या जयघोषात या भव्य, प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण संवाद कार्यक्रमाची सांगता झाली.
०००००
close