नेवासा, प्रतिनिधी : पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यात तब्बल सात वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर शेतकरी अंबादास साहेबराव शिरसाठ व राजेंद्र भीमराज गव्हाणे यांची अखेर निर्दोष मुक्तता झाली. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. I-176/2019 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन २०१९ मध्ये शेतातील पाटाच्या पाण्याच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी हे पाटबंधारे विभागात कार्यरत कर्मचारी असून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला होता. त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. शेतीसाठी पाणी मिळविण्याच्या प्रश्नातून निर्माण झालेल्या या प्रकरणात त्यांना काही काळ कारागृहातही राहावे लागले होते. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून आरोपींना जामीन मंजूर केला होता. या कालावधीत संबंधित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागले.
शेतकरी अंबादास साहेबराव शिरसाठ व राजेंद्र भीमराज गव्हाणे यांच्या विरोधात सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या काळातील राजकीय परिस्थितीमुळे या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विविध स्तरांवर आरोप-प्रत्यारोप झाले, वातावरण तापले आणि प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला. मात्र या सर्व घडामोडींमध्ये प्रत्यक्ष त्रास हा संबंधित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनाच सहन करावा लागला. न्यायालयीन लढाई, अटक, जामीन प्रक्रिया तसेच सामाजिक व आर्थिक परिणामांचा सामना करत त्यांनी तब्बल सात वर्षे संघर्ष केला.
सदर प्रकरणाची सुनावणी नेवासा येथील मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. वाघमारे साहेब यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदारांचे जबाब तसेच अभियोजन पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांचे सखोल परीक्षण करण्यात आले. मात्र आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस व विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात अभियोजन पक्षाला अपयश आले.
साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती, घटनाक्रमातील त्रुटी तसेच उपलब्ध पुराव्यांचा विचार करता आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर मा. वाघमारे साहेब यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणात आरोपी क्रमांक १ च्या वतीने विधिज्ञ पांडुरंग औताडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. कमलेश नवले यांनी सहाय्य केले. तर आरोपी क्रमांक २ च्या वतीने विधिज्ञ एन. एस. जोशी यांनी कामकाज पाहिले. बचाव पक्षाने मांडलेल्या मुद्द्यांचा, सादर केलेल्या पुराव्यांचा तसेच न्यायालयीन निर्णयांचा विचार करून मा. न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.
तब्बल सात वर्षे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागलेल्या शेतकरी कुटुंबाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
---
■ शेतकऱ्यांना व्यवस्थेने नाकारले; न्यायालयाने न्याय दिला
"शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणे आणि त्यांना कारागृहात जावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणातील शेतकऱ्यांना तब्बल सात वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला. तत्कालीन परिस्थितीत वातावरण तापले, मात्र त्याचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागला. अखेर मा. न्यायालयाने पुराव्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्यांना न्याय दिला. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे."
— ॲड. पांडुरंग औताडे
विधिज्ञ तथा युवक जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, अहिल्यानगर
मो. ९८९०२७३६५६

