वडाळा महादेव [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर, दि. ०५ जुलै : प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्लीपर बसमधून परवाना अटींचे उल्लंघन करून प्रवाशांच्या सामानाव्यतिरिक्त दुचाकी व व्यावसायिक मालाची अवैध वाहतूक होत असल्याचे तसेच अनेक बसना अतिप्रखर व डोळे दिपवणारे (डॅझलिंग) दिवे बसविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर यांच्या भरारी पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २७ स्लीपर बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करून एकूण जवळपास १ लक्ष ४५ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला .
प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर श्री. विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोटार वाहन निरीक्षक श्री. विशाल बटुळे , श्री. विशाल मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती राणी सोनवणे तसेच चालक श्री. अनिल दुर्गे यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.कारवाईतील ठळक बाबी: • लक्झरी/स्लीपर बसच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये प्रवाशांच्या स्वतःच्या सामानाऐवजी अथवा त्याशिवाय दुचाकी वाहने व व्यावसायिक माल वाहतूक होत असल्याचे आढळले, जे संबंधित परवाना अटींचे व मोटार वाहन कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.
• अशा प्रकारे जादा वजनाचा माल भरल्याने बसचा गुरुत्वमध्य (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी) बदलतो, परिणामी वळणावर व उतारावर बस पलटी होण्याचा धोका वाढतो व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो.
• अतिरिक्त मालवाहतुकीमुळे बसच्या ब्रेकिंग क्षमतेवर तसेच टायर्स व सस्पेन्शनवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. • अनेक बसना बसविण्यात आलेले अतिप्रखर, उच्च तीव्रतेचे दिवे (डॅझलिंग लाईट्स) समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांना दिपवून त्यांची दृष्टी क्षणिक बाधित करतात, त्यामुळे समोरासमोरील अपघातांचा धोका वाढतो. हे सीएमव्हीआर नियमांचेही उल्लंघन आहे. मालवाहतुकीसाठी वेगळा परवाना (गुड्स कॅरेज परमिट) आवश्यक असताना प्रवासी वाहतूक परवान्यावर माल वाहतूक करणे बेकायदेशीर असून तो कर व शुल्क चुकवेगिरीचाही प्रकार आहे.
• अशा गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या मालवाहतूकदार व प्रवासी वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होते व अनुचित स्पर्धा निर्माण होते.
तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या सर्व २७ बसचालक/मालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून परवाना अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
चौकट
-
[ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
श्री. अनंत जोशी यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यापुढेही अशा प्रकारच्या अनियमिततांविरोधात नियमितपणे विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येतील. बस मालक व चालकांनी परवाना अटींचे काटेकोर पालन करावे तसेच वाहनांवर अनधिकृत दिवे व उपकरणे न बसवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.]

