टिम इंडियाला सलग दोन आयसीसी करंडक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा सध्या मोठा डाव खेळण्यात कमी पडत असल्याने प्रशिक्षक गौतम गंभीर, रोहिताला संघाबाहेर काढण्याचे बहाणे शोधत आहे पण त्याच्या चाली त्याच्यावरच उलटत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण प्रस्तुत लेखात जाणून घेऊया.
आता संघात स्थान मिळण्यावरही संकट, संपूर्ण कहाणी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. रविवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा दिग्गज खेळाडू भारतासाठी आपला शेवटचा सामना खेळणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये, विशेषतः रोहित शर्मा, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात सर्व काही आलबेल नाही, ही गोष्ट नाकारता येत नाही. हीच परिस्थिती दोन्ही वरिष्ठ खेळाडू आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यातील संबंधांबाबतही म्हणता येईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला, पीटीआयच्या एका रिपोर्टनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, रोहित शर्मा रविवारी आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळू शकतो, कारण निवडकर्त्यांनी त्याला २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप संघात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हे वृत्त फेटाळून लावले. आता आणखी एक नवा रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंध कसे बिघडले, हे सांगण्यात आले आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, रोहितने स्वतः गंभीरशी संपर्क साधून त्याला २०२४ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता.
आयपीएल सामन्यादरम्यान रोहितने गंभीरला दिला होता कोचिंगचा प्रस्ताव
पीटीआयच्या सूत्रांनुसार, रोहितने गंभीरशी तेव्हा संपर्क साधला होता जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक सामना खेळत होता. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रोहितने एका सराव सत्रादरम्यान गंभीरशी चर्चा केली आणि त्याला भारतीय संघात सामील होण्यास सांगितले. त्यावर भारताच्या या माजी सलामीवीराने उत्तर दिले होते, "जर तू कर्णधार पदावर कायम राहणार असशील, तर मी नक्कीच संघात सामील होईन." हे सर्व घडत असताना, रोहितच्या एका जवळच्या व्यक्तीने त्याला चेतावणी दिली होती की, गंभीरसोबत काम करणे हे एक वेगळे आव्हान असेल, कारण रोहितला राहुल द्रविडच्या कोचिंग शैलीची सवय झाली होती. रोहित आणि गंभीर यांच्यातील मतभेद सर्वात आधी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील भारताच्या लाजीरवाण्या पराभवादरम्यान समोर आले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दोघांमधील दरी अधिकच वाढली.
ऑस्ट्रेलियातील रोहितच्या या एका विधानामुळे आले मतभेद
रोहित स्वतः खराब फॉर्ममुळे सिडनी कसोटी सामन्यातून बाहेर राहू इच्छित होता, हे सर्वांना माहीत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, आगरकर यांनी रोहितला असे पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला होता, कारण यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्या निवडीत अडचणी येऊ शकल्या असत्या. मात्र, माजी भारतीय कर्णधाराने तो कसोटी सामना खेळला नाही आणि कसोटी सामन्यादरम्यान एका दिवशी ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी दोन मुलांचा बाप आहे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे मला ठाऊक आहे." या विधानामुळे आगरकर आणि गंभीर दोघेही थक्क झाले आणि येथूनच त्यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला.
वनडे कप्तानीवरून हटवल्याने रोहित शर्मा खूश नव्हता
रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडे कप्तानीवरूनही हटवण्यात आले होते. रोहितला हटवून त्याच्या जागी शुभमन गिलला कर्णधार बनवण्याबाबत गंभीर आणि आगरकर या दोघांचे एकच मत होते. जेव्हा रोहितला याबद्दल समजले, तेव्हा तो अजिबात खूश नव्हता आणि त्यानंतर त्यांच्यात झालेली चर्चा फारशी चांगली राहिली नाही. यानंतर रोहितने दूरदृष्टी ठेवत विश्वचषकाची तयारी सुरू केली, परंतु गंभीर आणि आगरकर यांनी त्याला कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. निवड समितीने त्याला संघातून बाहेर केल्याची बातमी ज्या दिवशी समोर आली, त्या दिवशी रोहितचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता; कारण त्याच दिवशी त्याने कार्डिफमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ४७ चेंडूत २६ धावांची खेळी केली होती. आता ५० षटकांच्या या फॉरमॅटमध्ये या दिग्गज खेळाडूचे भविष्य काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय क्रिकेटमध्ये असा प्रकार नवा नाही
२००३ च्या वनडे विश्वचषकानंतर जेंव्हा जॉन राईटने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडले त्यावेळी कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीनेचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेलला टिम इंडियाचा कोच म्हणून आणले होते. पुढे जात त्यांच्यामध्ये असाच बेबनाव झाला आणि ग्रेग चॅपेलने गांगुलीला निव्वळ कर्णधार पदावरूनच काढले नाही तर संघातूनही घालवले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर असून गंभीरने रोहितचे कर्णधारपद खाल्लेच आहे, पण आता त्याच्या संघातील जागेवरही गदा आणू पहात आहे. बीसीसीआयने त्वरीत हस्तक्षेप करून प्रकरण थंड्या बासनात टाकले असले तरी गौतम गंभीर सारख्या सनकी माणसासोबत रोहितला काम करणं दिसतं तेवढं सोपं नाही.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. ९०९६३७२०८२

