*काळेवाडी च्या शाळेत लोकशाहीचा उत्सव उत्साहात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न*
काळेवाडी (ता. इंदापूर) : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, नेतृत्वगुणांचा विकास आणि जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे दि. २० जुलै २०२६ रोजी शालेय मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सकाळी ९.०० ते दुपारी ११.०० या वेळेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज छाननी, उमेदवारांची प्रचारपर भाषणे, गुप्त मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे या सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडल्या.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध वातावरणात मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, क्रीडामंत्री, सांस्कृतिक मंत्री, स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री, पर्यावरण मंत्री, शिस्त मंत्री व ग्रंथालय मंत्री या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. नेतृत्व, निर्णयक्षमता, जबाबदारी, संघभावना आणि सामाजिक जाणीव यांचा विकास घडविणारा हा उपक्रम ठरला. शाळेचे मुख्याध्यापक,प्रताप शिरसट सर व उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.सर्व मुलांनी या निवडणुकीत उत्साहाने सहभाग घेऊन आनंदाने मतदानाचा हक्क बजावला. सर्वानी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.

