shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यानगर–नेवासा पट्ट्यात अवैध खडी, क्रशर, डस्ट व मुरूम वाहतुकीचा सुळसुळाट?

रस्त्यांची दुरवस्था, पर्यावरण धोक्यात; संयुक्त विशेष कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी
सोनई //| प्रतिनिधी/
अहिल्यानगर–नेवासा मार्गावरील ज्ञानेश्वरी घाट, पांढरीपूल, वांजोळी, घोडेगाव, लोहगाव, सोनई व परिसरात अवैध खडी, क्रशसेंड, डस्ट, वाळू व मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून पर्यावरण, शेती, भूजलसाठा आणि शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दररोज सुमारे ३०० डंपरची वाहतूक होत असून पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळप्रदूषण आणि अपघातांच्या धोक्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांनी संबंधित वाहनांकडे वैध रॉयल्टी, वाहतूक परवाने आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. शेंडी, लोहगाव, मोरया, चिंचोरे परिसरातील नदीपात्रे, शेतजमिनी व काही शासकीय जागांमधून मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याचा आरोपही करण्यात आला असून त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, अनियंत्रित उत्खननामुळे भूजल पातळी घटणे, नदीच्या प्रवाहात बदल, शेतीसाठी पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. तसेच टेकड्या आणि डोंगरांचे नैसर्गिक स्वरूपही बदलत असल्याची चिंता व्यक्त केली जातआहे.अहिल्यानगर–संभाजीनगरमहामार्गासहपांढरीपूल–घोडेगाव–वडाळा मार्गावरील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. धूळप्रदूषणामुळे व्यापारी व ग्रामस्थांनाही आर्थिक व आरोग्यविषयक फटका बसत असल्याची तक्रार आहे.
स्थानिकांमध्ये कारवाईपूर्वी माहिती गळती होत असल्याची चर्चा असून, या दाव्याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महसूल, खनिकर्म, वन, सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण विभागांनी संयुक्त विशेष पथक स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अवैध उत्खनन व वाहतूक तातडीने थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
close