सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले सेना मेडल प्राप्त यांना ‘विश्वास गौरव–२०२६’ पुरस्काराने सन्मानित
इंदापूर पंचायत समिती माजी सभापती तथा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष विश्वासराव (दादा) रणसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा ‘विश्वास गौरव–२०२६’ पुरस्कार यंदा भारतीय सैन्यदलातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले सेना मेडल प्राप्त यांना प्रदान करण्यात आला. कळंब ता.इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या ३४ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला गौरव म्हणून विश्वास गौरव २०२६ पुरस्कार संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी अध्यक्षा आनंदी रणसिंग,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त राही रणसिंग,प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,डॉ.प्रशांत शिंदे ,मुख्याध्यापक महादेव बागल,मुख्याध्यापक बाळू कदम,माजी सैनिक भगवान वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रणसिंग,सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन भोसले यांच्या आई पार्वती भोसले,बंधू मनोज भोसले,पत्नी वंदना भोसले,मुलगा शिवतेज,मुलगी वैष्णवी भोसले उपस्थित होते.
यावेळी संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, शैक्षणिक, संरक्षण, कृषी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी ‘विश्वास गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा प्रतिष्ठानने जपली असून, यंदा सेवा, शिस्त, समर्पण, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या संरक्षण क्षेत्रातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले यांना पुरस्कार देत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुभेदार मेजर जयपाल भोसले यांनी भारतीय सैन्यदलातील आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकाळातील अनेक प्रेरणादायी अनुभव, शौर्य आणि साहसाच्या आठवणी उपस्थितांसमोर उलगडल्या. देशसेवा ही केवळ नोकरी नसून राष्ट्राप्रती असलेली सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी शिस्त, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा जोपासून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सन्मान सोहळ्याला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी,मान्यवर, विविध क्षेत्रातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवदेन अभिजीत शिंगाडे व आभार प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले.
संस्था संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब,माध्यमिक विद्यालय तावशी,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयात जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाले.
फोटो ओळ - कळंब ता. इंदापूर येथे विश्वास गौरव पुरस्काराने सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले यांना सन्मानित करताना संस्था पदाधिकारी

