इंदापूरच्या औद्योगिक विकासाला मिळणार मोठी गती - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर: इंदापूर औद्योगिक क्षेत्र (MIDC) टप्पा क्र. ३ च्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विधान भवन, मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील सुमारे १००० एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.
बैठकीत यापूर्वी मंजूर झालेल्या जमिनीचा उर्वरित ताबा एमआयडीसीकडे तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सलग १००० एकर क्षेत्र एमआयडीसीला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करणे, रेडी रेकनरनुसार आर्थिक कार्यवाही तातडीने पूर्ण करणे आणि उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रापैकी १० टक्के जागा कृषी आधारित उद्योगांसाठी राखीव ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल, नवीन उद्योग उभारले जातील आणि स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
इंदापूरचा सर्वांगीण व शाश्वत विकास हेच आमचे ध्येय असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाच्या समन्वयातून आवश्यक ती सर्व कार्यवाही वेगाने सुरू असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

