shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाघोलीत ऑनलाइन फसवणुकीचा मोठा धक्का!विम्याचे पैसे मिळणार सांगून ४० लाखांचा चुना; सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा..

वाघोली, पुणे : विमा बचत योजनेची मुदत संपली असून त्याची रक्कम मिळवून देतो, असे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एका ४५ वर्षीय व्यक्तीला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून विमा बचत योजनेची मुदत संपली असून त्यातील रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एनओसी, कर, प्रक्रिया शुल्क आणि इतर विविध कारणे सांगून पीडित व्यक्तीकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीने मोठ्या रकमा ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या.


दरम्यान, वारंवार पैसे भरूनही विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

सायबर चोरट्यांचा नवा फंडा

विमा पॉलिसीची माहिती असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळणे, अशा पद्धतीने हा सायबर फसवणुकीचा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.


सायबर गुन्हेगारांकडून फोन, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलच्या माध्यमातून विमा, बँक, कर्ज अथवा गुंतवणुकीशी संबंधित आमिष दाखवले जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणत्याही खात्यावर पैसे जमा करू नयेत, तसेच OTP, बँक तपशील किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलिसांकडून सुरू आहे.

०००

close