जामखेड : नान्नज शिवारातील गायरान जमिनीवर गोवंश जातीचे बैल कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा आरोप करत पाच जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव अरुण साठे (वय 29, रा. आण्णाभाऊ साठे नगर, नान्नज) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या FIR नुसार, 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महादेव साठे हे आपल्या नातेवाईकांसह नान्नज शिवारातील गायरान परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे गोवंश जातीचे अंदाजे 9 ते 10 बैल ठिकठिकाणी बांधलेले असून त्यांना चारा-पाणी नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराने या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण व जनावरांचे टॅग क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये नोंदवल्याचे FIR मध्ये नमूद आहे. त्यानंतर घटनास्थळी काही व्यक्ती आल्या आणि जनावरे आपली असल्याचे सांगून ती घेऊन जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी तक्रारदार व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना धमकीवजा भाषा वापरून तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने डायल 112 वर माहिती दिल्याचेही FIR मध्ये नमूद आहे.
या प्रकरणी सोहेल कुरेशी, समीर कुरेशी, कालू कुरेशी, मुन्ना महमद कुरेशी आणि सलमान इस्माईल कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIR क्रमांक 574/2026 असून गुन्ह्याची नोंद 19 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.51 वाजता जामखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. FIR मध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित कलमांचा उल्लेख आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम बाबन सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, FIR मध्ये नमूद आरोपांवरूनच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

