इंदापूर: काळेवाडी, ता. इंदापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, विविध आजारांचे वेळेवर निदान व्हावे आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आरबीएसके (RBSK) टीम क्र. १ मार्फत विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न झाली.
सदर आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे सर व डॉ. सुंबरे मॅडम यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांची उंची, वजन, दृष्टी, दात, कान, नाक, घसा तसेच सर्वसाधारण शारीरिक आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आवश्यक विद्यार्थ्यांना पुढील उपचार व तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य तपासणी उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाळेतील शिक्षकांनी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती, नोंदी व आवश्यक सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमासाठी उपक्रमशील शिक्षिका सौ. कांचन रणपिसे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा महत्त्वाचा पाया असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होते. उपस्थितांनी आरबीएसके टीमच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली

