प्रामाणिकपणाचा आदर्श! समाधी मंदिरात सापडलेली रोख रक्कम सुरक्षित परत; पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या हस्ते राजेंद्र दोहाडे यांचा सत्कार
समाधी मंदिरात सापडलेली ₹३,४९० ची रक्कम साईभक्त महिलेला परत; पहारेकरी राजेंद्र दोहाडे यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागातील पहारेकरी श्री. राजेंद्र दोहाडे यांनी आपल्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा उत्कृष्ट आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
आज समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात गस्तीदरम्यान त्यांना ₹३,४९०/- इतकी रोख रक्कम सापडली. त्यांनी कोणताही विलंब न करता सदर रक्कम संरक्षण कार्यालयात प्रामाणिकपणे जमा केली.
त्यानंतर संरक्षण विभागाने तत्परतेने चौकशी करून संबंधित साईभक्त महिलेची ओळख पटविली. ही रक्कम सौ. कासिमी कोटा रामा यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सदर रक्कम सुरक्षितपणे परत करण्यात आली.
या प्रसंगी श्री. राजेंद्र दोहाडे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
श्री साईबाबांच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जपलेली ही प्रामाणिकतेची परंपरा साईभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत असून, अशा घटना संस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणाऱ्या आहेत.

