लोणी (प्रतिनिधी):
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या लोणी येथील हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रुग्ण व प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व सोयी-सुविधांयुक्त 'प्रवासी निवारा' (बस शेड) उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी 'डब्ल्यूसीपीए' (WCPA) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, समाजभूषण डॉ. दत्ता विघावे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या चेअरमन व विश्वस्त मंडळाला अधिकृत पत्र पाठवले आहे.
रुग्ण व नातेवाइकांचे हाल थांबावेत
प्रवरा मेडिकल ट्रस्ट व हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात अविरतपणे उच्च दर्जाची आरोग्य सेवा दिली जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक लोणी येथे येतात. उपचारासाठी येणारे-जाणारे बहुतांश नागरिक एसटी बस अथवा इतर सार्वजनिक वाहनांवर अवलंबून असतात.
परंतु, हॉस्पिटलबाहेरील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना पुरेशी सावली किंवा बसण्यासाठी प्रवासी शेड उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनांची वाट पाहताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रस्त्यावर उघड्यावरच ताटकळत उभे राहावे लागते.
ऊन-पावसाचा बसतोय मोठा फटका
कडक ऊन, वादळी वारा तसेच मुसळधार पावसात वृद्ध, अशक्त आणि गंभीर आजारांतून नुकतेच बरे झालेले रुग्ण जास्त वेळ उभे राहू शकत नाहीत. परिणामी, त्यांना मोठ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी सामाजिक व मानवीय दृष्टिकोनातून हॉस्पिटल समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बैठक व्यवस्थेसह सुसज्ज असे 'बस स्टँड / प्रवासी शेड' (Bus Shelter) तात्काळ उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. विघावे यांनी केली आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णोपयोगी सेवाकार्यात या उपक्रमामुळे आणखी एक मोलाची भर पडेल, असा विश्वासही डॉ. विघावे यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

