ईद-ए-मिलादनिमित्त श्रीरामपूरात कार्यक्रम;
श्रीरामपूर / प्रतिनिधी: धर्माची निर्मिती माणसाला माणसाशी कसे वागावे, याचे मूल्याधिष्ठित नियम देण्यासाठी झाली. कोणताही धर्म हिंसा, द्वेष किंवा दुसऱ्याला दुःख देण्याची शिकवण देत नाही.प्रत्येक धर्माच्या केंद्रस्थानी माणुसकी, समता,प्रेम आणि बंधुभाव हीच मूल्ये आहेत.त्यामुळे धर्माचा वापर सत्तेच्या राजकारणासाठी नव्हे,तर समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
मानवता संदेश फाऊंडेशन, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए-मिलादनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण लिखित ‘ओळख इस्लामची’या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण ससाणे होते तर व्यासपीठावर आमदार हेमंत ओगले,मुफ्ती मोहम्मद रिजवान,सिद्धार्थ मुरकुटे डॉक्टर वसंत जमधडे,अशोक उपाध्ये, रवींद्र गुलाटी,राजेंद्र पवार,डॉ.दिलीप शिरसाट,बिट्टू कक्कड,जावेद शेख,गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. तांबे पुढे म्हणाले कि समाजात न्यायव्यवस्था किंवा राज्यसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वी मानवी आचारसंहिता म्हणून धर्माची निर्मिती झाली.सर्व धर्मसंस्थापक हे मानवतावादी आणि समाजसुधारक होते.प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी एकेश्वरवादाबरोबरच समता,बंधुभाव आणि ज्ञानसाधनेचा संदेश दिला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ज्ञान मिळत असेल,ते आत्मसात करण्याची प्रेरणा त्यांनी दिली.संत तुकारामांसह भारतीय संतपरंपरेनेही धर्माचा खरा अर्थ माणुसकी आणि सदाचारात असल्याचे अधोरेखित केले आहे.
आजच्या काळात धर्माचा वापर अनेकदा राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचे दिसते.अशा परिस्थितीत समाजाला धर्माची मूलभूत मानवतावादी शिकवण समजावून सांगणारे साहित्य अधिक महत्त्वाचे ठरते,असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ‘ओळख इस्लामची’ या ग्रंथाविषयी बोलताना आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, सलीमखान पठाण यांनी इस्लाममधील मानवतावाद, शांतता,समता आणि सर्वधर्मसमभाव यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा परिचय करून देणारा हा ग्रंथ नव्या पिढीला धर्माचा व्यापक आणि विधायक अर्थ समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.समाजात बंधुभाव,परस्पर आदर आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्यासही तो हातभार लावेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नगराध्यक्ष करण ससाणे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.पत्रकार विकास अंत्रे यांनी या ग्रंथाचा आशय सविस्तरपणे मांडला.लेखक सलीमखान पठाण यांनी ग्रंथ निर्मिती मागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार करण नवले यांनी केले.स्वागत जमीन बागवान सूत्रसंचालन संतोष मते तर आभार अशोक उपाध्ये यांनी मानले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

