shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुवंदनेने दुमदुमले एल. जी. बनसुडे विद्यालय; गुरुजनांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गुरुवंदनेने दुमदुमले एल. जी. बनसुडे विद्यालय; गुरुजनांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) : "गुरु आहे मान आमचा, गुरु आहे सन्मान आमचा, गुरु आहे आधार आमचा; मानवंदना देऊनी तयांना, गोडवा वाढवू पवित्र नात्याचा..." या भावपूर्ण ओळींनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र सोहळ्याला सुरुवात करत गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथे गुरुपौर्णिमा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मेजर श्री. विठ्ठल शिंदे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सचिव व कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, विश्वस्त श्री. दर्शन बनसुडे, श्री. हनुमंत (आप्पा) मोरे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, पालक प्रतिनिधी श्री. आकाश नगरे, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महतीचे वर्णन करणारी भाषणे, मनोगते, कविता, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुरुंबद्दलची कृतज्ञता, आदर आणि श्रद्धा व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वाहनचालक-मालक यांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. "आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे," या संतवचनाचा उल्लेख करत शिक्षिका सौ. राजुली जाधव यांनी गुरुंच्या महान कार्याचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान, संस्कारांचे महत्त्व आणि ज्ञानाच्या उपासनेचे मूल्य अधोरेखित केले. प्राचार्य श्री. संजय इंगोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून गुरुपौर्णिमेच्या परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. ज्योती मारकड व श्री. प्रकाश दरदरे यांनी केले, तर सौ. विद्या पोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विश्वस्त मंडळ, पालकवर्ग आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले. ज्ञान, संस्कार, कृतज्ञता आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा हा गुरुपौर्णिमेचा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
close