शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह:
पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी): पुण्यातील बाणेर परिसरात एकतर्फी प्रेमातून झालेल्या थरारक खुनाच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या घटस्फोटित व्यक्तीने महिला रहात असलेल्या जागेच्या मालकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संबंधित महिलेच्या मागे सातत्याने लागला होता. महिलेच्या संपर्कात असलेल्या जागेच्या मालकाबद्दल आरोपीच्या मनात संशय निर्माण झाला. त्यानंतर त्याने मालकाचा पाठलाग करून धारदार कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीकडून वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात अटक झालेला असून जामिनावर बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे बाणेर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकतर्फी प्रेमातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

