*आश्रमशाळांच्या अनुदानासाठी शरदचंद्र पवार यांच्याकडे साकडे; मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे आश्वासन*
*इंदापूर, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा योजना राबवली जाते, या योजनेमुळे निवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास व भोजन सुविधा एकाच छताखाली मिळतात. परंतु शासनस्तरावरून परिपोषण आहार अनुदान, इमारत भाडे व इतर बाबींकरिता सातत्याने जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात.प्रलंबित परिपोषण अनुदान, इमारत भाडे व आश्रमशाळांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकी संदर्भात महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज पुणे येथे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान राज्यातील आश्रमशाळांना प्रलंबित तसेच नियमित अनुदान तातडीने मिळावे, आश्रमशाळांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावे, या सबंधीचे गाऱ्हाणे शिष्टमंडळाच्या वतीने खा.शरदचंद्र पवार साहेबांसमोर मांडले.
सबंधित प्रश्न ,मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आदरणीय पवार साहेबांनी शिष्टमंडळाला दिले. आश्रमशाळांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना स्वतंत्र पत्र पाठविणार असल्याचे पवार साहेबांनी सांगितले.
आश्रमशाळांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झालेली ही भेट अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक ठरली असून, शासनस्तरावर या प्रश्नांना गती मिळेल अशी अपेक्षा शिष्टमंडळाने पवार साहेबांच्या भेटीदरम्यान व्यक्त केली आहे.
या भेटीवेळी शिष्टमंडळामध्ये संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शेषेराव चव्हाण, राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (श.प.)कार्यकर्ता व प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. राहुल मखरे, मानवेंद्र केंद्रे, भाऊराव जाधव (वाशिम), कुंदन राठोड (जालना), भारतसिंग राठोड, प्रशांत चौधरी, ॲड. समीर मखरे, सुशील पवार, ॲड. प्रतिभा गवळी, गोरख तिकोटे, डॉ. अनार्या मखरे, तानाजी दिवेकर, हर्षल भाऊराव जाधव, पृथ्वीराज चौधरी आदी उपस्थित होते.
आश्रमशाळांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेचा संघर्ष यापुढे ही सुरूच राहील. एकजूट, संवाद आणि सकारात्मक प्रयत्नांतून प्रश्नांची सोडवणूक करूया, असा निर्धार यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

