shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार जाहीर

उत्कृष्ट रस्ता, उत्कृष्ट पूल व उत्कृष्ट इमारत निर्मितीतील योगदानाची दखल

अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र अंकुश पालवे यांचा २९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार सन्मान

रमेश जेठे 
अहिल्यानगर /प्रतिनिधी:
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या अभियंता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश अशोकराव पालवे यांना सन २०२५-२६ करिताचा मानाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वैयक्तिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.

अंकुश पालवे यांनी आपल्या १८ वर्षांच्या शासकीय सेवेत उत्कृष्ट रस्ते, पूल, इमारती तसेच विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. समाजाला डोळ्यासमोर ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कामातील गुणवत्ता, नियोजनबद्ध अंमलबजावणी व कमी कालावधीत विकासकामे पूर्ण करण्याची कार्यशैली यामुळे त्यांच्या कामाची शासनाने दखल घेतली आहे.

अंकुश पालवे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना आठ वर्षांपासून रखडलेले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम विशेष प्रयत्न करून अवघ्या एका वर्षात पूर्ण केले. एडीबी अंतर्गत सिद्धटेक–कोर्टी रस्त्याच्या कामासाठी विशेष प्रयत्न करून कमी कालावधीत परवानगी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे या रस्त्याला राज्यातील ‘उत्कृष्ट रस्ता’ म्हणूनही गौरविण्यात आले आहे.
दोन वर्षांच्या कालावधीत नियोजन व निविदा प्रक्रियेसह किमान २०० कोटी रुपयांच्या इमारतींची बहुतांश कामे पूर्णत्वास नेण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. अहिल्यानगर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, मुख्य न्यायालयीन निवासस्थाने, महसूल भवन, पाथर्डी तहसील कार्यालय, कर्जत व जामखेड येथील शासकीय रुग्णालये व विश्रामगृह इमारती, पारनेर तालुका न्यायालय इमारत तसेच आदर्श गाव हिवरे बाजार येथील प्रशिक्षण संकुल टप्पा दोन या कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कोविडच्या काळात १०० घाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाची उभारणी करण्यासाठीही त्यांनी विशेष योगदान दिले.
अंकुश पालवे यांच्या कार्यकाळात कोंभळी–कर्जत–राशीन मार्गावरील अनेक वर्षे रखडलेली व वादग्रस्त कामे स्थानिक व प्रशासकीय पातळीवर सर्वांशी समन्वय साधून पूर्ण करण्यात आली. सुमारे सात वर्षे रखडलेले काम मार्गी लागले. शेवगांव–पैठण रस्ता, शेवगांव–मिरी–नगर रस्ता, पैठण ते मोहटादेवी नवीन मार्गाचा प्रस्ताव, पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्या जोडण्याचे काम तसेच नगर–मनमाड रस्त्यावरील बाभळेश्वर व देहरे येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे टोलनाके बंद करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न व मोठा कागदी तसेच न्यायालयीन लढा दिला.
राहुरी तालुक्यातील तास आंग्रेवाडी येथील मुळा नदीवरील दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम केवळ १८ महिन्यांत बचतीसह पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे नागरिकांच्या सुमारे ४० किलोमीटर अंतराची बचत झाली. निमगांव गांगर्डा येथील सीना नदीवरील मोठा पूल, सामनगांव येथील ढोरा नदीवरील मोठा पूल तसेच इतर विविध पुलांच्या कामांमध्येही त्यांचे योगदान राहिले.
राहुरी तालुक्यातील ताहराबाद या दुर्गम भागातील रखडलेले व वादग्रस्त ग्रामीण रुग्णालयाचे काम विशेष प्रयत्न करून केवळ दोन वर्षांत पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असताना आदिवासी बहुल व आकांक्षित जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यांसाठी ‘साकव’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली. केवळ सहा महिन्यांत किमान नऊ साकवांचे बांधकाम पूर्ण करून आदिवासी बांधवांची गैरसोय दूर करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील सावळदे–रनाळा–शनी मांडळ या एडीबी अंतर्गत मोठ्या रस्ते प्रकल्पाचे काम शून्यापासून सुरू करून अंतिम टप्प्यात आणण्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असताना केवळ एका वर्षात किमान दहा मोठ्या इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली. यापैकी पाच इमारती २६ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी हस्तांतरित करण्यात आल्या.
नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या पाच इमारतींचा एकाच दिवशी प्रत्यक्ष वापर सुरू करण्यासाठी अंकुश पालवे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ चोंडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, मंत्री व मान्यवरांच्या दौऱ्यांचे वेळोवेळी सुयोग्य नियोजन केले.
सन २०२३ मध्ये नाशिक विभागाच्या ‘नमो महास्वयंरोजगार मेळाव्या’चे उत्कृष्ट नियोजन करून राज्यात सर्वात कमी खर्चामध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात त्यांचा सहभाग राहिला. सात्रळ येथे विश्वविक्रमामध्ये नोंद झालेल्या श्री गंगागिरी महाराज सप्ताहाच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
सन २०१४ पासून लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांचे संपर्कप्रमुख व समन्वयक अधिकारी म्हणून अंकुश पालवे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. विभागाच्या कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी त्यांनी काटेकोर नियोजन केले. पंतप्रधानांसह अन्य व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यांचे वेळोवेळी सुयोग्य व यशस्वी नियोजन करण्यातही त्यांचे योगदान राहिले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोनच्या कार्यालयाला शासनाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यातही त्यांचा सहभाग राहिला. विभागांतर्गत क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन स्पर्धांचे नियोजन करण्यासह शासनाच्या विविध विकासकामांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल अभियांत्रिकी क्षेत्रासह, शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह परिवार,मखदूम सोसायटी आणी समता परिवारासह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद
खान - अहिल्यानगर


*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close