*काळेवाडी नं १ शाळेत साक्षरतेचा जागर; आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा!*
*वाचनाची गोडी, ज्ञानाची ओढ आणि साक्षरतेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविले*
इंदापूर - काळेवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी नं. १ येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साक्षरतेची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कल्पनाशक्ती व ज्ञानसमृद्धी वाढावी यासाठी अवांतर वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी साक्षरतेमुळे व्यक्तीच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल, तसेच समाजात वावरताना निरक्षरतेमुळे निर्माण होणाऱ्या विविध अडचणी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेची प्रतिज्ञा दिली. तसेच दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांच्या माध्यमातून साक्षरतेचे महत्त्व, साक्षर आणि असाक्षर व्यक्तीच्या जीवनातील फरक आणि शिक्षणाची ताकद विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली.
“साक्षरता म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम आणि स्वावलंबी जीवन जगण्याची ताकद आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन, ज्ञान आणि साक्षरतेचा संकल्प केला. उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

