shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा पाटबंधारे विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ?

कार्यारंभ आदेशांच्या प्रती न दिल्याचा आरोप; नाशिक अधीक्षक अभियंत्यांकडे कारवाईची मागणी

मोहन शेगर | सोनई प्रतिनिधी

नेवासा : मुळा पाटबंधारे विभागांतर्गत मुळा उजवा व मुळा डावा कालव्याशी संबंधित सन २०२४-२५ या कालावधीतील विविध कामांच्या कार्यारंभ आदेशांच्या प्रती माहितीच्या अधिकारांतर्गत मागूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप अर्जदार मोहन दादा शेगर (रा. सोनई, ता. नेवासा) यांनी केला आहे.


शेगर यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करून मुळा पाटबंधारे विभागांतर्गत सन २०२४-२५ मध्ये झालेल्या विविध कामांच्या कार्यारंभ आदेशांच्या सर्व प्रती मागितल्या होत्या. मात्र, मागितलेली माहिती पूर्णपणे मिळाली नसल्याचे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

माहिती न मिळाल्याने त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अपील दाखल केले. अपील सुनावणीच्या विविध तारखांना आपण उपस्थित राहूनही समाधानकारक माहिती देण्यात आली नाही आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप शेगर यांनी केला आहे.

दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागांतर्गत झालेल्या काही कामांच्या दर्जाबाबत तसेच शासकीय निधीच्या वापराबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तसेच काही कामे प्रत्यक्षात झाली आहेत की नाही, याची पडताळणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींची निष्पक्ष व वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून न देणाऱ्या संबंधित उपविभागीय अधिकारी, अपीलीय अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेगर यांनी अधीक्षक अभियंता, नाशिक यांच्याकडे केली आहे.

माहिती न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मागितलेली संपूर्ण माहिती तसेच संबंधित कामांची चौकशी तातडीने करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोहन शेगर यांनी दिला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी आणि माहिती अधिकारातील अर्जदाराला नियमानुसार संपूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

000

close