shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरेगाव यात्रा उत्सवासाठी उंदीरगाव ग्रामपंचायतीची जय्यत तयारी

भाविकांना सुलभ दर्शनासह विविध सुविधा उपलब्ध; प्रशासनाला सहकार्य करण्याचे संचालक वीरेश गलांडे यांचे आवाहन

वडाळा महादेव [प्रतिनिधी] : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे होणाऱ्या पवित्र मतमाउली यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंदीरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा उत्सवाच्या कालावधीत भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच प्रत्येक भाविकाला सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


हरेगाव येथील मतमाउली देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, राज्याच्या विविध भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून तसेच विविध मार्गांनी हरेगाव येथे दाखल होत असतात. नवसपूर्तीसाठीही भाविकांची मोठी गर्दी होत असते.

यात्रा कालावधीत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, नागरी सुविधा, निवास व प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सहकार्याने यात्रा उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याची माहिती अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक वीरेश पाटील गलांडे यांनी दिली.

यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, वाहतूक व गर्दीचे नियमन करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन गलांडे यांनी केले.

या नियोजनासाठी सरपंच प्रतिभाताई गोलवड, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गोलवड, आरोग्यमित्र भीमराज बागुल, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पंडित, संजय काळे, दीपक बोधक, सचिन गायकवाड, आरोग्य सेवक अजित गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत उंदिरगांव व हरेगाव  सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
close