shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी विकास सोसायटीच्या गाळ्यांवर सभासदांचा हक्क; पारदर्शक कारभाराची मागणी

सभासदांच्या मुलांना व्यवसायासाठी प्राधान्य द्या; खतपुरवठा, नाश्ता गाड्यांचे उत्पन्न व दिवाळी भेटीबाबतही नानासाहेब शिंदे यांचे निवेदन

शिर्डी : संस्थेच्या मालकीचे व्यावसायिक गाळे बाहेरील व्यक्तींना देण्याऐवजी संस्थेच्या सभासदांना अथवा त्यांच्या मुलांना व्यवसायासाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, अशी ठाम मागणी शिर्डी विकास सोसायटीचे सभासद तथा भाजपचे प्रांतिक सदस्य नानासाहेब शिंदे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संस्थेच्या मालकीच्या गाळ्यांचा लाभ सर्वप्रथम सभासदांच्या कुटुंबांना मिळाल्यास स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध होईल आणि संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारे उत्पन्न संस्थेच्या सभासदांच्या हितासाठीच उपयोगी पडेल, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यासोबतच स्थानिक शेतकरी सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी युरिया खत वेळेवर आणि योग्य दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक वेळी खत मिळणे ही संस्थेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेच्या परिसरात संध्याकाळच्या वेळी लागणाऱ्या नाश्त्याच्या गाड्यांबाबतही पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या गाड्यांची संख्या, त्यांच्याकडून मिळणारे उत्पन्न आणि त्यासंबंधीची स्वतंत्र नोंद ठेवून ती वार्षिक अहवालात सभासदांसमोर जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवाळी सणाचे औचित्य साधून संस्थेतील सर्व सभासदांना दरवर्षी मिठाई व चिवड्याची भेट देण्यात यावी, अशी भावनिक मागणीही करण्यात आली आहे. अशा उपक्रमामुळे सभासदांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ होऊन संस्थेबद्दलचा विश्वास आणि जिव्हाळा वाढण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

सभासदांचे हित, स्थानिक युवकांना व्यवसायाची संधी, शेतकऱ्यांना वेळेवर खत आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांवर आगामी सभेत सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नानासाहेब शिंदे पाटील यांनी व्यक्त केली आहे.


— नानासाहेब शिंदे पाटील
सभासद, शिर्डी विकास सोसायटी, शिर्डी

०००

close