shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक कापूस दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद व शिवार फेरी संपन्न..

कृषि विद्यापीठ शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द - कुलगुरु डॉ. विलास खर्चे

जावेद शेख / राहुरी : 
कपाशी हे मोठी उत्पादनक्षमता असलेले आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे पीक आहे. कापूस उत्पादक शेतकरी प्रयोगशील आणि अभ्यासू असून, त्यांनी अनुभवातून 
स्वतःची लागवड तंत्रे विकसित केली आहेत. या अनुभवाला विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कपाशीच्या उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते. विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचे कपाशी पिकावर सकारात्मक परिणाम प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकांतून दिसून येत आहेत. कृषि विद्यापीठ शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे 
प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कापूस सुधार प्रकल्प, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत जागतिक कापूस दिनानिमित्त कापूस पीक शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व शिवार फेरीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक (नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन) तथा फर्टीलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अहिल्यानगर आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीत लाटे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, पाणी फाउंडेशनचे विश्वनाथ सुर्यवंशी, विक्रम फाटक, सडे येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश धोंडे, कोंढवड येथील शंकरराव म्हसे, मानोरी येथील रेणुका माता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. यास्मिन शेख, दवणगांव येथील स्वामी समर्थ उत्पादक गटाच्या अध्यक्षा सौ. कल्याणी खपके उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरु डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की हवामान बदलामुळे पावसात पडणारे मोठे खंड खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम करत आहेत. परतीच्या पावसाचीही शाश्वती नसल्याने पाण्याचे मोल ओळखून प्रत्येक थेंब साठविणे आणि जमिनीत जिरविणे ही काळाची गरज आहे. आजही अनेक शेतकरी एकपीक पद्धतीचा अवलंब करतात. बदलत्या हवामानात शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आंतरपीक पद्धतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. डॉ. सुरेश कुमार चौधरी मार्गदर्शन करतांना म्हणाले की देशाच्या प्रगतीत कापूस पिकाचा मोठा सहभाग राहिलेला आहे. यावर्षी हवामानातील बदल मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कृषि हवामानशास्त्र या विषयातील अभ्यासानुसार दर 30 वर्षांनी एक वर्ष असे येते की त्यामध्ये एल निनो आणि ला निना यांच्या प्रभावाने दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आजच्या या जागतिक कापूस दिनानिमित्त या ठिकाणी जे कपाशी पिकाचे अद्ययावत तंत्रज्ञान, कपाशीच्या प्रत्येक वाणांचे प्रयोग, त्यांची वैशिष्ट्ये, रोगांचे नियंत्रण, पाण्याचे व्यवस्थापन इ. माहितीचे प्रक्षेत्रावरील प्रयोग पाहण्यासारखे आहेत. येथील तंत्रज्ञानाची माहिती आपल्याजवळ न ठेवता इतरांनाही द्या. कपाशी हे अजूनही शेतकऱ्यांचे प्राण असणारे पीक आहे. सध्या एकरी कपाशीचा खर्च खूप मोठा आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी खतांचा वापर विवेकाने करावा. विद्यापीठामधील संशोधनाचा वापर शेतकऱ्यांनी केला तरच शेती फायद्याची होईल असे यावेळी ते म्हणाले. 

डॉ. प्रशांत बोडके आपल्या भाषणात म्हणाले की कापूस हे पीक मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जोडलेले आहे. कापूस उद्योगामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती होते आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. डिजीटल शेती शाळेंमध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विद्यापीठाचे तंत्रज्ञान व मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितात. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होत आहे. प्रदीप लाटे, प्रकाश धोंडे, शंकर म्हसे, यास्मिन शेख, कल्याणी खपके यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन कुलवाल यांनी केले. 
यावेळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात कपाशीचे विविध वाण, तंत्रज्ञान तसेच विद्यापीठाने विविध पिकांचे विकसीत केलेले वाण, तंत्रज्ञान प्रदर्शीत करण्यात आले होते. तसेच कापूस सुधार प्रकल्पाच्या 25 एकर प्रक्षेत्रावर कपाशीच्या 40 वाणांचे विविध प्रयोगांचे थेट पीक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना बघण्यास मिळाले. यामध्ये प्लॉस्टिक मल्चिंग, ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, शेंडा खुडणी तंत्रज्ञान, वाढ व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, विद्यापीठाने विकसीत केलेले विविध वाण, ड्रोन तंत्रज्ञान इ. तंत्रज्ञानाचे प्रात्येक्षिके शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बघण्यास मिळाले. यावेळी शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिकांना व प्रदर्शनाला भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कापूस पिकातील विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तांत्रिक सत्रामध्ये आंतरविद्याशाखा जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील यांनी कापूस पिकातील संतुलीत खत व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. अधिर आहेर यांनी मानले.

 या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, डॉ. उत्तम कदम, डॉ. भिमराव कांबळे, डॉ. प्रकाश लोखंडे, मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सुरसिंग पवार, डॉ. दत्तात्रय वने, अण्णासाहेब बाचकर, इतर शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी, कणगर, मानोरी, पुणतांबा, धामोरी येथील शेतकरी गटाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close