१७१) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता...
आपण जेव्हा इतिहासाकडे पाहतो तेव्हा कोणतिही संस्था, त्याची इमारत, त्यांची निर्मिती यामध्ये बहुतांश ठिकाणी देणगीचा धागा आढळतो.
असं म्हणतात की सद्या सुबत्ता फारच आलेली आहे. मग पूर्वी सुबत्ता नव्हती काय असा प्रश्न उभा राहतो. विचारांती समजते की, सुबत्ता नव्हती पण दान करण्याची प्रवृत्ती होती, आज सुबत्ता आहे पण कोणी कोणाला स्वतः हून दान करायच्या मनस्थितीत नाही, एक इंच जमीन सोडायला तयार नाही. उलट जमिनी हडपण्याचे कारस्थान जास्त दिसते.
म्हणजे सुबत्ता आल्याने माणुसकी संपली. पूर्वी कोणत्याही सत्कार्यासाठी गावात जमीन दान करणारे अनेक जण असत. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. विशेष चिंतनाचा भाग असा आहे की संपत्ती आली की मानवी कल्याणाच्या संकल्पना बोथट होत जातात आणि संपत्ती अजून अजून कशी वाढवली जाईल या विचारांचा प्रभाव वाढतो.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावोगावी ज्या शाळा उभ्या राहिल्या त्यापैकी अनेक शाळांना गावातील मंडळींनी जमिनी दिलेल्या आहेत. आज त्याच गावात त्यांच्याच मुलांकडे जमिनी नाहीत. पूर्वी शेतकऱ्यांकडे विपुल जमिनी होत्या, खिशात संपत्ती नव्हती. मात्र मनात लोककल्याणाच्या भावना होत्या. आज खिशात संपत्ती आहे मात्र लोककल्याणाच्या भावना बोथट होत आहेत. याला बिघडलेले सामाजिक पर्यावरण असे म्हणतात. हा सामाजिक पर्यावरणीय ऱ्हास थांबवण्यासाठी संपत्ती निर्मिती सोबतच माणुसकीचे लोककल्याणकारी संस्कार रुजवणे गरजेचे असते. हे संस्कार अलीकडच्या काळात रुजविले गेले नाहीत. ही चूक सुधारणे गरजेचे आहे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५