shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दीपावली निमित्त उंबरगाव शाळेत विद्यार्थ्यांकडून दीपोत्सव साजरा !स्तूतीजन्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक..!

शौकतभाई शेख श्रीरामपूर
 शाळा आणि ज्ञानार्जन हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सर्वश्रूत समीकरणच आहे. शाळेतून घेतलेले धडे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते. गावकर्‍यांसोबत इतरांनीही कौतुक करावे असा दीपोत्सवाचा उपक्रम उंबरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला.  

असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे हीच मुळात आनंद देणारी बाब आहे. ज्या शाळेत आपण ज्ञानाचे धडे घेतो,त्याच ज्ञानरूपी शिदोरीच्या सहाय्याने विद्यार्थी भविष्यात मार्गक्रमण करतो, अशा शाळेत रोषणाई केली जावी अशा उद्देशाने विद्यार्थ्यांनी दिवाळी प्रथम शाळेत साजरी केली. उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी पुढाकार घेत दिवाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करताना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.त्याचवेळी सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प मांडला.सर्व विद्यार्थ्यांनी होकार देत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले.

दिवलीच्या दिवशी रंगी बेरंगी कपडे परिधान करून नटून थटून आलेला प्रत्येक विद्यार्थी पणतीसह आला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच आनंदाची पणती प्रत्येक वर्गासमोर दीप लावून तो वर्ग सुशोभित केला. पणत्यांनी रोषणाई करून संपूर्ण शालेय परिसर प्रकाशमय करून समृद्ध केला. फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा खराखुरा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकासह एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आगळ्यावेगळ्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,राजेंद्र राऊत,जितेंद्र भोसले,मुख्याध्यापक लताबाई पालवे व सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.
-
close