म्हणूनच सुनील साळवे यांचा आदर्श
मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान !!
मुख्याध्यापक सुनील साळवे (सर) आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माध्यमिक शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे वतीने उत्कृष्ठ प्रशासक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील प्रभाकर साळवे (सर) यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथे अमर ज्योत मंगल कार्यालयात शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपत मोरे यांच्या शुभहस्ते व जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत सुनील साळवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सुनील साळवे ३२ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या सेवेत आहेत. मालुंजा, कोल्हार, वडाळा महादेव, गणेशनगर, पुणतांबा येथे शिक्षक म्हणून त्यांनी उत्तमरीत्या सेवा बजावली आहे, तर श्रीरामपूर याठिकाणी उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षापासून ते कार्यरत आहे.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल श्री.सुनील साळवे यांचा मुंबई येथे राजभवनात तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते तर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे हस्ते सन्मान झालेला आहे.
रोटरी क्लब श्रीरामपूर, रांजणखोल ग्रामपंचायत, मानवी कल्याण पुरस्कार मुंबई, भारत सरकार युवा क्रीडा मंत्रालयाचा नेहरू युवापुरस्कार,इंडियन अचिवर्स अवॉर्ड यांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांनी श्री.साळवे यांचा सन्मान केलेला आहे.
श्री.सुनील साळवे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य करणाऱ्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव आहेत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती,युवक बिरादरी भारत,आदी महत्त्वाच्या संस्थांवर जिल्हा पदाधिकारी म्हणून काम करत आहेत.
रयत शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक काम करताना त्यांना रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे पाठबळ व सहकार्य मिळाले. त्यांच्यामुळेच विद्यालयाची गुणात्मक वाढ भौतिक विकास सुरू आहे. शैक्षणिक कार्य करताना मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन मिळाले असल्याची प्रतिक्रिया सुनील साळवे यांनी यावेळी दिली.
सुनील साळवे यांचे पुरस्काराचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, तालुका गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, श्रीरामपूर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर , सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सेक्रेटरी मिथुन डोंगरे, प्राचार्य प्रवीण बडदे, प्राचार्य संजय कांबळे, प्राचार्य मुकुंद पोंधे, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद, सचिव सुनील म्हसे, पीडीएफचे तालुकाध्यक्ष रवींद्र औताडे, दत्तात्रय कांबळे, श्रीराम कुंभार, नितीन जाधव, डी.डी. काचोळे विद्यालयाचा सर्व स्टाफ व रेड क्रॉस संघटनेचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111