प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
पाच सबस्टेशनची क्षमताही झाली दुप्पट
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत केज मतदार संघातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत आपेगाव आणि साळेगाव या सबस्टेशनसाठी प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत.
याशिवाय चिंचोली माळी, आडस, येळंब घाट, बनसारोळा आणि धनेगाव या सबस्टेशनची क्षमता ५ एमव्हीए वरून १० एमव्हीए पर्यंत वाढवण्यास देखील मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे सदरील सबस्टेशनवर अवलंबून असणारी वीज यंत्रणा सक्षम होणार असून शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा अधिक स्थिर आणि निश्चित स्वरूपात उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यभरात सबस्टेशनची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यात केज मतदार संघातील विविध भागातील सबस्टेशनना प्राधान्याने मंजुरी मिळाली आहे. आ. नमिता मुंदडा यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा करून संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्या या पाठपुराव्याचे फलित म्हणून बीड जिल्ह्याला एकाचवेळी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन क्षमता वाढविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना रात्री जागरण करण्याची गरज भासणार नाही. सिंचनासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वीज उपलब्ध होणार आहे. विजेवरील अनियमित भार कमी होऊन यंत्रणा सुरळीत आणि कार्यक्षम राहील. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू
"आपेगाव, साळेगाव व इतर सबस्टेशनसाठी मंजूर झालेले पॉवर ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत आणि प्रत्यक्षात कार्यान्वित व्हावेत, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत."
-आ. नमिता मुंदडा