शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
नागपूर:- दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी सुट्टीत सर्व प्रकारचे प्रवाशी आपल्या मूळ गावी जातात. नोकरदार , नातेवाईक आपल्या कुटुंबाला भेटायला जातात.. दिवाळी म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. तर मुले मामाच्या गावाला आगीन गाडीतून जात मज्जा करतात.याशिवाय जवळची तीर्थक्षेत्र देवदर्शन असे कार्यक्रमही सुट्टी असल्याने या काळात आयोजित केले जातात.
साहजिकच बस असो की रेल्वे यांना या काळात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. विशेषतः मुंबई आणि नागपूर या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळी सण उत्सव काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारुन नागपूर ते मुंबई दोन एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. यापूर्वी उत्सव काळात एकूण ४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी दोन विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा झालेली आहे. दिवाळी केवळ आठवडा भर जवळ आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार असून प्रवाशांची गर्दी प्रचंड असते. त्यामुळे दिवाळी पूर्वी आणि परतीच्या प्रवासासाठी आणखी काही गाड्या वाढविण्यात याव्या. तसेच सुरू झालेल्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
आगामी दिवाळी, छट पूजन अशा विविध सणांमध्ये रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई मार्गावर चार 'फेस्टिव्हल स्पेशल' गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाली असून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन तिकीट काउंटरवरुन बुकिंग करता येईल. परंतु सध्या तरी दिवाळीसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते मुंबई दोन एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दोन्ही विशेष ट्रेनची संरचना दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशी आहे. गाड्यांचे आरक्षण विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागपूर ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वनवे स्पेशल ०१०७६ सुपरफास्ट स्पेशल काल शनिवार, दि.१५ ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी दीडला सुटली. तर रविवार दुसऱ्या दिवशी पहाटे चारला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहचली. दरम्यान, ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबली होती. तसेच दुसरी गाडी नागपूर- मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वनवे स्पेशल आहे. ही ०१०७८ सुपरफास्ट स्पेशल दि. १८ ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी दीडला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.५० ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. सदर गाडी ही वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे येथे थांबेल. विशेष म्हणजे रेल्वे प्रवाशांना विदर्भातील समृद्ध परंपरागत वारसा रेल्वे स्थानकांवर दिसणार आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेसाठी रेल्वेकडून वेगाने काम केले गेले आहे. स्टॉल्समध्ये एकसमानता राखण्यासाठी सर्व स्थानकांवर एकासारखेच डिझाईनचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.अशा पध्दतीने रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सेवा दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.