शौकतभाई शेख श्रीरामपूर:-
आषाढी (पुणे ते पंढरपूर) वारी मधील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप तसेच आरोग्य विषयक जनजागृती निमित्त घेतलेल्या सक्रिय सहभागाबद्दल भोकर तालुका श्रीरामपूर येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोहित सुनील विधाटे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे हस्ते पुणे येथे नुकताच गौरव करण्यात आला.
सदर वारीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२२ मध्ये वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती, यामध्ये जिज्ञासाचे संयोजक डॉक्टर रोहित विधाटे यांचा उत्कृष्ट वैद्यकीय सेवा कार्याबद्दल सन्मान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर श्रीराम रावरीकर यांच्या उपस्थितीत पुणे महानगरात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सत्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
डॉक्टर रोहित विधाटे हे श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावचे रहिवासी प्रा. सुनील विधाटे यांचे सुपुत्र असून ते सातत्याने सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल भोकर गावातील समस्त ग्रामस्थ बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे समस्त पदाधिकारी व कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.