राष्ट्रीय सेवा योजना सामाजिक बांधिलकी जोपासणारी युवा चळवळ -डॉ. भगवान माळी.
इंदापूर वार्ताहर:
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीच्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भगवान माळी उपस्थित होते. राष्ट्रीय योजना दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी युवा चळवळ आहे." आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संवादासाठी प्रत्येकाकडे विविध साधने उपलब्ध आहे. इंटरनेटच्या वापरामुळे जग हे एक खेडे बनले आहे. मोबाईल, व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक, आदिम मुळे आजचा तरुण यामध्ये ग्रुपटत आहे.असा आरोप तरुणाईवरती केला जातो आहे. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असलेल्या युवकांच्या बाबतीत काही अंशी ते खोटे ठरते कारण या योजनेशी जोडलेल्या युवकांची समाजबांधिलकी आजही टिकून आहे कारण ही योजना मुळातच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या मनात जी सामाजिकतेची जाणीव निर्माण करून त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे.
प्रेरणा स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणा, स्वावलंबन, चारित्र्यसंवर्धन, सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून
आणण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच 24 सप्टेंबर 1969 सालापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत राबवण्यात येते.तेव्हापासून 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून प्रत्येक वर्षी महाविद्यालयात साजरा केला जातो.
विध्यार्थ्यानी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरात लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांना समजावून घेऊन वैविध्यपूर्ण रचनात्मक कार्य करणे, चिरस्थायी व शाश्वतकार्य अशा कार्यातून ग्रामविकासाला हातभार लावणे. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे अशा या सामाजिक बांधिलकीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास साध्य करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली व त्यातूनच आदर्शवत महाविद्यालयीन युवकांची चळवळ आज उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते आहे. हे राष्ट्रीय सेवा योजनेचे यश आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होऊन सामाजिक काम केले पाहिजे असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, "माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी" हे या राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य असून त्यातून विध्यार्थ्यांना लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. निस्वार्थ सेवेची गरज दाखवून देते. या बोधवाक्यातून माणुसकी व मानवता याबद्दल सहानुभूती ठेवणे तसेच व्यक्तिगत कल्याणातून समाजाचे कल्याण साध्य होत असते. त्यासाठी परिवर्तन आवश्यक असते. अशा या सामाजिक परिवर्तनासाठी महाविद्यालयीन युवा युवतीनी राष्ट्रीय सेवा योजना ही एक सामाजिक बांधिलकी जोपासणारी युवा चळवळ बनवली पाहिजे.असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय मोरे यांनी केले. प्राध्यापक बाबासाहेब चव्हाण यांनी मानले. यावेळी प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी,कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

