ऑस्ट्रेलियाविरूध्दची तिन वनडे सामन्यांची मालिका दुसऱ्या सामन्यानंतरच खिशात घालून टिम इंडियाने मायदेशातच होऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेत उतरताना आयसीसी मानांकनात स्वतः अव्वल स्थान पटकावून विश्वजेतेपदावर दावेदारी सांगितली आहे. मात्र हे कार्य दिसायला जितके सोपे दिसते त्यापेक्षा अनेक पट महाकठिण आहे. याचा अनुभव टिम इंडियापेक्षा इतर कोणत्याच संघाला नसेल.
शुकवारी बावीस सप्टेंबरला मोहालीत कसोटीच्या विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला वनडेच्या अव्वल क्रमांकावरून हटविले त्याचबरोबर एकाच वेळी वनडे, टि- ट्वेंटी व कसोटीत आयसीसी मानांकनात प्रथम क्रमांक मिळविण्याचा अविश्वसनीय पराक्रम केला. क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा भारत केवळ दुसराच देश ठरला. दक्षिण आफ्रिकेने सन २०११ मध्ये अशी कामगिरी करण्याची किमया क्रिकेटच्या इतिहासात प्रथम साधली होती.
तसे बघाल तर टिम इंडियाने स्वतंत्ररित्या अनेक वेळा वनडे, टि-ट्वेंटी व कसोटीचे आयसीसी अव्वल मानांकन मिळविले आहे. मात्र क्रिकेटच्या या तिनही प्रारूपात एकाच वेळ आयसीसी मानांकनात दादागिरी करण्याचा मान भारताला प्रथमच मिळाला आहे. वास्तविक बघाल तर आयसीसीचे मानांकन क्रिकेटचे खरे चित्र दाखवत नाही. नुकतेच वनडेच्या आयसीसी मानांकनावरून पायउतार झालेल्या पाकिस्तानचेच बघा, त्यांचे बरेचसे विजय मायदेशातच व तेही तुलनेने कमकुवत असलेल्या नेपाळ, झिंबाब्वे, अफगाणिस्तान, युएई, आयर्लंड, नेदरलॅंड, बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज, हाँगकाँग व इतर संघांविरूध्द आहे. त्यामुळे त्यांचे विजयाचे प्रमाण चांगले असून मालिका विजयांचे गुण इतर संघांच्या तुलनेत वरचढ ठरले. त्यामुळे अव्वल मानांकन सहजरीत्या मिळाले. त्याचबरोबर त्यांचे अनेक खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी व अष्टपैलू खेळांडूच्या नामांकनात अग्रस्थानी आहेत.
याच पाकिस्तानची इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, द. आफ्रिका व भारत असे मातब्बर संघ समोर आल्यावर चांगलीय तारांबळ उडायची. मात्र कमकुवत संघांविरुध्द जास्त प्रमाणात खेळल्यामुळे त्यांचे मानांकन वरचढ ठरायचे. हे त्यांचे खरे स्वरूप समोर आल्यावर त्यांच्याच देशात त्यांचेच लोक त्यांची छि-थू करत आहेत.
आपल्या टिम इंडियाचेच बघा ना मागच्या दोन वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप साखळीत प्रत्येक वेळी अग्रणी होते. मात्र प्रत्यक्ष अंतिम सामन्यात भारताला आपला तो जोश टिकविता न आल्याने पाहिल्यांदा न्युझिलंड व नंतर ऑस्ट्रेलियाने कसोटीचे विश्व अजिंक्यपद मिळविले व भारताला दोन्ही स्पर्धांच्या साखळीत अव्वल राहूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सन २०१४ च्या टि२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरूध्द हरण्यापूर्वीही भारत साखळीत सरस होता. सन २०१६ ला भारतात झालेल्या टि२० विश्वचषकात विंडिज विरूध्द पराभूत होण्याआधी भारत साखळीत अव्वल होता.
सन २०१७ च्या चॅंपियन्स ट्रॉफीतही साखळीत भारताने अव्वल क्रम मिळविला. त्याच स्पर्धेत साखळीत पाकिस्तानला लिलया लोळविले मात्र अंतिम सामन्यात पाक पुढे सपशेल लोटांगण घातले. सन २०१९ ला इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या साखळीत आपल्या गटात टिम इंडिया अव्वल स्थानी होती, मात्र निर्णायक उपांत्य सामन्यात न्यूझिलंड समोर हत्यारे म्यान केले. सन २०२२ च्या टि२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियामध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध हरण्यापूर्वी भारत साखळीत अव्वल होता.
भारताचा हा इतिहास सांगण्यामागचे कारण म्हणजे भारत कोणत्याही मोठया स्पर्धेच्या साखळीत अव्वल असतो, आयसीसीच्या मानांकनांत प्रथम क्रमांकाचा संघ असतो परंतु निर्णायक किंवा विजेतेपदाचा हक्क सांगणाऱ्या सामन्यात प्रतिस्पर्ध्या समोर साष्टांग लोटांगण घेतो. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. निव्वळ मानांकनात अग्रक्रम मिळविणे मानाचं असलं तरी निव्वळ प्रथम रँक मिळवून जगज्जेतेपद मिळत नाही. त्यासाठी खऱ्याखुऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणे गरजेचे आहे. त्यासाठी भारताला आपल्या सर्व प्रकारच्या प्रारूपातील आयसीसी मानांकन सार्थ करून दाखवायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम मायदेशात होऊ घातलेल्या वनडे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दाखविणे गरजेचे आहे व त्यानंतर टि२० व कसोटीचे अजिंक्यपद मिळवून आपला जागतिक क्रिकेट वरचा दबदबा आणखीच भक्कम करावा. हिच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांची टिम इंडियाकडून अपेक्षा आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

