कळस ( प्रतिनिधी ):- भक्ताची अनेक लक्षण असून नरकाला जाण्याची भीती घातली तरी सत्कर्म न सोडणारा खरा भक्त असतो. असे मत ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, डोंबवली चतुर्थ कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास ||
गेले आशा पास निवारून
विषय तो त्यांचा झाला नारायण ||
तेणे न आवडे जन धन, माता पिता ||
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना भाग्यवंत महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
श्री. भाग्यवंत महाराज म्हणाले की, भक्ती मार्गात अडसर ठरणारे जन, धन, आई वडील सुद्धा आवडत नाही असा खरा भक्त असतो, ज्याने सर्व आशा पास सोडले तो खरा भक्त आहे, ज्याचा देह उदास झाला असा खरा भक्त होय. असे भक्ताची लक्षण आहेत.
यावेळी ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, मृदंगाचार्य ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे, हार्मोनियम वादक देवा महाराज वाकचौरे , विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते.
ह.भ.प. कैलास महाराज आहेर कळस यांनी प्रवचन सेवा केली. श्री. ज्ञानेश्वर आवारी व किसन वाकचौरे यांनी संतपंगत दिली.

