मागील अनेक दिवसांपासून भारत व पाकिस्तान या शेजारी देशात द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नसल्याने दोन्ही संघ एकमेकांचे दौरेही करत नाहीत व सातत्याने बाहेरच्या देशातही खेळत नाही. मात्र आयसीसी व आशियाई स्पर्धात हे दोन संघ आपसातील क्रिकेटची भूक भागवतात. तसं बघाल तर भारत पाक सामन्यांची आंतरराष्ट्रीय वर्तळात मोठी क्रेझ आहे. या दोन संघाच्या सामन्याची तिकिटे हातोहात विकले जातात व जगातल्या कुठल्याही मैदानांवर हाऊसफुल्ल झाल्याशिवाय राहात नाही.
भारत - पाक सिमेवर पाककडून सातत्याने कुरापती व आंतकवाद्यांना सहाय्य करण्याचे कृत्य सुरू असलेल्या भारताने त्यांच्याशी क्रिकेटचे द्विपक्षीय संबंध तोडले आहेत. तरीही यांच्यातील क्रिकेट सामन्यांची कट्टरता संपली नाही. याच पार्श्वभूमीवर भारतात विश्वचषकाचे आयोजन होत असताना पाकचे भारतात येणे संदिग्ध बनले होते. परंतु तणावाचे वातावरण निवळले, व्हिसाचा तिढा सुटला. भारत - पाक आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद असल्याने पाकचा संघ दुबई मार्गे भारतात आला.
हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाकिस्तानी संघाचे न भूतो न भविष्यती असे स्वागत झाले आणि भारताविषयी असलेले गैरसमज क्षणार्धात दूर झाले. पाकच्या खेळाडूंनी सोशल मिडीयावर भारताच्या आदरतिथ्याचे तोंडभरून कौतुक केले. यामध्ये पाकिस्तानातील प्रसार माध्यमे, सोशल मिडीया, माजी खेळाडू व सामान्य जनताही आघाडीवर होती. मात्र याच धामधुमीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष झका आश्रफ या राजकिय ढोंगाड्याने भारताविरूध्द गरळ ओकताना भारताची " दुश्मन मुल्क " अशी हेटाळणी करताना आनंदाच्या वातावरणात विरजन टाकण्याचे काम केले. मात्र याचा परिणाम इतका उलट झाला की, हाच नाठाळ झका आश्रफ पाकिस्तानातच खलनायक बनला.
निजामाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैद्राबादची खमंग बिर्याणी जगभर प्रसिद्ध आहे आणि खास करून पाकिस्तानी खेळाडू बिर्याणीचे मोठे खवय्ये आहेत. भारतात आल्यापासून हैद्राबादी बिर्याणीवर ते यथेच्छ ताव मारत असून यामुळे पाकिस्तानी खेळाडू सुस्त (स्लो) झाल्याचे त्यांचाच उपकर्णधार शादाब खानने सांगितले.
भारतात येण्यापूर्वी पाक संघ वनडेच्या आयसीसी मानांकनात अव्वल स्थानी होता. परंतु आशिया चषकातील गचाळ कामगिरी व भारताचे विजेतेपद ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाने भारताने वनडेचे प्रथम मानांकन आपल्याकडे खेचले. याबरोबर पाकचे आसन रिकामे झाले. त्याचबरोबर प्रमुख खेळाडूंच्या दुखापती व खेळाडूंमधील अंतर्गत कलहाने पाक क्रिकेट ढवळून निघाले. त्यामुळे त्यांना अंतिम संघ जाहिर करण्यास सर्वात जास्त उशीर झाला. त्यामुळेच त्यांना व्हिसा मिळण्यासही विलंब झाला.
भारतात आल्यावर हैद्राबाद त्यांचे होमग्राऊंडच बनले. परंतु पहिले दोन्ही सामने त्यांना गमवावे लागले. त्याच पार्श्व भूमिवर त्यांची शुक्रवारी नेदरलँडविरूध्द लढत झाली. नवख्या हॉलंड संघाने पाकच्या डावाला सुरूवातीलच खिंडार पाडल्याने पाकच्या गोटात खळबळ माजली. मात्र अनुभवी मोहम्मद रिजवान व नवख्या साऊद शकिलने शतकी भागीदारी करून पाकच्या डावाला आकार दिला. पुढे शादाब खान व नवाजने सन्मानजनक धावसंख्या फलकावर लावली. मात्र पाकिस्तानने नव्यानेच सुरू केलेल्या परंपरेनुसार त्यांचा संघ पूर्ण पन्नास षटके न खेळताच सर्व बाद झाला.
२८७ धावांचा पाठलाग करताना डच खेळाडूंनी धैर्याने खेळ केला मात्र या मोठ्या स्तरावर खेळण्याचा त्यांचा अनुभव तोकडा पडला व पाक गोलंदाजांनी त्याचा अचूक लाभ उचलत ८१ धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली व मागील दोन प्रयत्नात भारतीय भूमीवर विश्वचषकात विजय न मिळविण्याची आपलीच परंपरा खंडीत करून पाकचे खाते उघडले.
पाकिस्तानी संघ प्रबंधन आपल्या मर्जीतल्याच खेळाडूंना संधी देत असते. हे जगजाहीर आहे. याच चुकीच्या धोरणामुळे साऊद शकील सारखा चांगला खेळाडू संघाबाहेर बसायचा. मात्र एका सराव सामन्यात त्याने केलेल्या सरस कामगिरीमुळे त्याने अंतिम संघात स्थान मिळविले. या संधीचे त्याने दोन्ही हाताने सोने केले व पाकला सुस्थितीत नेले. याच बळावर तो सामनावीरही ठरला. पाक संघाने या सामन्यात विजय जरी मिळविला असला तरी त्यात पाहिजे तो सफाईदारपणा नव्हता. त्यांची टॉप ऑर्डर फलंदाजी, निष्प्रभ फिरकी गोलंदाजी व खराब क्षेत्ररक्षण पुढील सामन्यात अडचणीचे ठरू शकते.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com