विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलामीची लढत टिम इंडियाने जिंकली खरी, पण तो विजय मिळविताना भारताच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी समस्त भारतीय क्रिकेट शौकीनांच्या तोंडचे पाणी पळविले होते. मात्र अनुभवी फलंदाज विराट कोहलीने नाशिबाची साथ मिळवत लोकेश राहुलसह दमदार दिडशतकी भागीदारी करून टिम इंडिया भोवती घोंगावणारे पराभवाचे काळेकुट्ट ढग पांगविले. पण विजय नजीक आला असताना कोहली राहुलची साथ सोडून तंबूत परतला. राहुल त्यानंतर आलेल्या हार्दिक पांडयासह संघाची विजयी नैय्या पैलतिरी घेऊनच माघारी फिरला.
चेन्नईमध्ये हिंदी महासागराला लागूनच असलेल्या सुप्रसिद्ध चेपॉक स्टेडियमवर कांगारू कर्णधार पॅट कमिन्स नाणेफेक जिंकला पण निर्णय घेण्यात साफ फसला. चेन्नईतील दमट हवामान व संध्याकाळी मैदानावर दव पडत असल्याचं सर्वश्रूत असताना त्याने स्वतः फलंदाजीचा निर्णय घेऊन जणू सामन्याचे सुत्रच भारताच्या हातात दिले. भारताने तिन फिरकी गोलंदाज संघात घेतले हे कमिन्स विसरून गेल्याचे जाणवले.
दुखापतीतून सावरलेल्या जसप्रित बुमराहाने सुरुवातीलाच मिचेल मार्शचा काटा शुन्यावरच काढला. त्यानंतर डेव्हीड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथने डावावर नियंत्रण मिळविले असे वाटत असताना भारतीय फिरकी गोलंदाज मोर्चावर आले व सामन्याचा नूरच पालटला. गेली अकरा वर्ष चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना तेथील खेळपट्टीचा ओतप्रोत अनुभव गाठीशी असलेल्या रविंद्र जडेजाला चांगलाच सूर गवसला. स्मिथ, लाबूशेन व कॅरीला एकामागोमाग पिटाळून जडेजाने भारताचे कार्य सुकर केले. तर कुलदिपने दोन व आश्विनने एक फलंदाज खिशात घालून ऑस्ट्रेलियाचे उधळू पाहणारे वारू आवरले. बुमराहाने दोन तर हार्दिक पांड्या व आश्विनने प्रत्येकी एक बळी घेऊन कांगारूचा डाव दोनशेच्या आत गुंडाळला.
भारताच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावगती कधीच वाढवू दिली नाही. टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मैदानावरची प्रत्येक चाल यशस्वी ठरली, गोलंदाजीतील बदल योग्य ठरले. त्यामुळेच पाच वेळचे विश्वविजेते पहिल्याच सामन्यात अडखळले.
खेळपट्टीवर चेंडू अचानक खाली राहायचे तर कधी चांगलेच वळायचे, त्यामुळे कांगारू फलंदाजांना खुलून खेळताच आले नाही. शेवटी पन्नास षटके संपण्यापूर्वीच एकशे नव्यान्नव धावांवरच त्यांचे ताबूत थंडावले.
कांगारूंचा डाव संपेपर्यंत सर्व काही टिम इंडियाच्या मनाप्रमाणेच घडत होते. तेंव्हा प्रत्येकाला वाटत होते की भारत एक सफाईदार विजय मिळवून धावगती सरस करून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाईल. मध्यंतराला भारताचे सगळेच समर्थक आनंदी होते. मात्र भारताचा डाव सुरू होताच ते आनंदी चेहरे सुतक पडल्यासारखे काळवंडून गेले. त्याचं कारणही तितकंच बोलकं होतं. नेहमी आपण नियतीला जबाबदार धरताना नियतीच्या मनात होतं म्हणून असं झालं तसं झालं अशी पिरपिर लावतो. मात्र यावेळी नियतीने नाही तर भारताच्या टॉपच्या फलंदाजांनीच आपल्या संघाच्या नव्हे तर सर्व समर्थकांच्या तोंडचे पाणी पळविले.
आपला पहिलाच विश्वचषक सामना खेळणाऱ्या ईशान किशनने स्वतः खेळलेल्या पहिल्याच चेंडूची विनाकारण छेड काढली आणि त्यानंतर बाकीचं काम यष्टीरक्षकाने बिनचूक पुर्ण केले. त्यानंतर कर्णधार रोहित चेंडूच्या रेषेत न येताच उभ्या उभ्या चेंडू खेळला, मात्र पंचानी त्याला पायचित ठरविले व तिसऱ्या पंचानी त्यावर शिक्कामोर्तब केले. चौथ्या क्रमांकावर मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या श्रेयस अय्यरला संयम व समय सुचकता यांचं काही भान नसल्याचंच दिसलं. दोन गडी पाठोपाठ बाद झाल्यानंतर शांतपणे कोहलीला साथ देत डाव उभारायचं सोडून विट्टी दांडूमध्ये जशी कोलाकोली करतान अगदी तसाच कव्हरमध्ये चेंडू करून परतला. विशेष म्हणजे रोहित, किशन व अय्यर यांनी धाव लेखकाला कुठलाच त्रास न देता पॅव्हेलियनचा रस्ता धरला. ते तिघे बाद झाले तेंव्हा वाईड व लेगबाय अस्ते मिळून दोन धावा फलकावर होत्या. भारताच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीला बाद झालेले तीनही फलंदाज शुन्यावरच परतले होते. त्यावेळी भारताला प्रथम ग्रासे मक्षिपःत होतो की, काय असे चित्र निर्माण झाले होते.
परंतु त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयम व चिकाटीने खेळताना कसोटीत खेळतात तसं खेळून डाव सावरला व संघाला सुस्थितीत नेले. विजय जवळ आला असता कोहली (८५ धावा) बाद झाला. परंतु तोपर्यंत भारतावरचे संकट टळले होते. राहुलने नाबाद ( ९७ धावा ) करून विजयी फटका मारला आणि सगळ्याच भारतीयांचा जिव भांड्यात पडला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण त्यांच्या लौकिकाला साजेशे नव्हते. भारताचे तीन फलंदाज दोन धावांवरच परतल्यानंतर संघाच्या वीस व कोहलीच्या बारा धावा असताना मिचेल मार्श कडून त्याचा झेल सुटला व तेथेच सामनाही कांगारूंच्या हातातून निसटला. त्यानंतर कोहली व राहुलने भारताला सुरक्षित केले. कांगारूंचा कर्णधार कमिन्सचे नाणेफेकीपासून ते क्षेत्ररचना लावण्यात व गोलंदाजांचा योग्य बदल करण्यातले सर्वच निर्णय अंगलट आले. भारताचे तीन गडी लवकर बाद झाले असताना हेजलवूड व स्टार्कला दोन दोन षटके दिले असते तर सामन्याचे चित्र वेगळेच दिसले असते. शिवाय प्रमुख फिरकी गोलंदाज एडम झांपाला गोलंदाजीला आणताना फार उशीर केला. जम बसलेल्या कोहली - राहुल जोडीने झांपालाच टारगेट करून कमिन्सच्या नेतृत्वाचे पितळ उघडे पाडले. राहुलने शेवटपर्यंत मैदानात राहून संघाचा विजय साकारला त्याचे फळ त्याला सामनावीर सन्मानाने मिळाले.
टिम इंडियाची गोलंदाजी तर चांगली झाली. मात्र फलंदाजांना आपल्या कामगिरीत मोठी सुधारणा आणावी लागेल तरच बारा वर्षानंतर विश्वविजेते होण्याचे स्वप्न सत्यात उतरवता येईल.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

