shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेदरलॅंडने द.आफ्रिकेला खरोखर चकीत केलं ?



              भारत हा विभिन्न,भाषा, वेष, पंथ, धर्म, वातावारण, हवामान, संस्कृती व परंपरेने एकवटलेला एक सुसंस्कृत व विस्तृत देश आहे. प्रत्येक तिन किलोमिटरवर भाषाशैली बदलली जाते. परंतु भारतात असे काही उत्सव, सण व खेळ आहेत की, ते या सर्वांना एकाच तालासुरात वागायला व जगायला लावतात. त्यापैकी एक म्हणजे क्रिकेट !  याच क्रिकेटचा चार वर्षातून एकदा होणारा विश्वकुंभमेळा अर्थात विश्वकरंडक स्पर्धा सध्या भारतात सुरू आहे. भारतातील विविध राज्यातील वेगवेगळ्या दहा शहरात विविध खंडातील दहा अग्रणी संघ जागतिक क्रिकेटचे सम्राट बनण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

             अपेक्षेप्रमाणे यजमान भारत आपली पकड मजबूत करत असताना ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसारखे लोकांच्या पसंतीचे संघ आपल्या ढिसाळ कामगिरीमुळे गुणतालिकेत खालच्या दिशेला पहुडले आहेत. तर अफगाणिस्तान व नेदरलॅंड सारखे कुणाच्या खिजगणतित नसलेले संघ चमत्कारीक कामगिरी करून सर्वांचेच आकर्षण व चर्चेचा विषय बनले आहे. मात्र इंग्लंड व द.आफ्रिका संघ याच दोन संघांकडून चकीत झाल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी कळत न कळत संशयानेही बघितले जात आहे.

               तीन दिवसात दोन अनपेक्षित निकाल लागल्याने स्पर्धा सर्वांसाठी खुली दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ नेहमीप्रमाणे मजबूत संघातच गणला जातो. परंतु आयसीसीच्या स्पर्धात महत्वाच्या व निर्णायक सामन्यात पचकण्याची त्यांना सवयच जडली असल्याने "चोकर्स" म्हणून त्यांची हेटाळणीही केली जाते. मंगळवारी रात्री एका सामन्यात कसोटीचा पूर्ण दर्जा नसलेल्या व पात्रता फेरीतून थेट विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरलेल्या नेदरलँड संघासोबत त्यांचा सामना झाला. प्रत्यक्षात या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून प्रतिकार हा काही झालाच नाही. नवख्या नेदरलँडने सामन्यावर एकदा मिळवलेली पकड ढिली होऊ दिलीच नाही.
               द.आफ्रिकेने आपले सुरुवातीचे दोन सामने श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरूध्द विश्वविक्रमी कामगिरी करत जिंकून इतर सहभागी प्रतिस्पर्धी संघात आपला वेगळाच दरारा निर्माण केला होता. त्यांचे सर्वच फलंदाज जोरदार फॉर्मात होते तर फिरकी व जलदगती गोलंदाजही चांगल्याच जोशात होते. मात्र त्यांचा हा जोश नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात एकाएकी कसा काय उतरला ? प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.
              नाणेफेक जिंकल्यानंतर द.आफ्रिकेन कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून आपल्या जोमात असलेल्या फलंदाजांना आपले हात मोकळे करण्यासाठी प्रथम फलंदाजी घेणे गरजेचे होते. धर्मशाळा सारख्या अपरिचित ठिकाणी सामना असल्याने बवुमाने विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. परंतु त्याने डच संघास प्रथम फलंदाजीस पाचारण करून आपल्या संघातीलच छुप्या कारस्थान्यांना संधी उपलब्धी करून दिली. द.आफ्रिकेन संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय सुमार दर्जाचे झाले तर महत्वाचे झेलही सोडले गेले. शिवाय गोलंदाजही निष्प्रभ ठरत असताना पाच बाद ब्याऐंशीवरून पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात हॉलंडने ४३ षटकात २४५ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये डच कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज स्कॉट एडवर्डसची ७८ धावांची नाबाद खेळी हॉलंडला विजयाच्या दिशेने घेऊन गेली.
                या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासातील विश्वविक्रमी धावा करणारे द.आफ्रिकेन फलंदाज हे आव्हान लिलया पार करतील असे वाटत होते. त्यातच पहिल्या दोनही सामन्यात शतके ठोकणारा क्विंटन डिकॉक चांगल्याच फॉर्मात असल्याने हे टार्गेट झटपट साध्य होईल असेच वाटत होते. मात्र यावेळी नियतीच्या मनात वेगळंच काही घोळत होते. द.आफ्रिकेच्या कोणत्याच फलंदाजाने प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसले नाही. बऱ्याच जणांनी आपल्या विकेट फेकल्या तर काहींनी हारीकिरी केल्याचे जाणवत होते. मात्र येथे डच खेळाडूंचे श्रेय आपल्याला हिरावूण घ्यायचे नाही व द.आफ्रिकेन संघालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे नाही. सामना हॉलंडने ३८ धावांनी जिंकून गुणतालिकेत सांख्यिक स्थान मिळविले असल्याने स्पर्धा सर्वांसाठी खुली झाली.
               तरीही सामन्यानंतर अनेक माजी खेळाडू, क्रिकेट पंडित, प्रसारमाध्यमे, युट्युब चॅनेल्सवर द.आफ्रिकेन खेळांडूच्या अंतर्गत बंडाळीवर मोठे चर्चासत्र सुरू होते. वर्णद्वेषामुळे द.आफ्रिका एकविस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडीपार होते. सन १९९१ मध्ये त्यांच्यावरील बंदी उठली. त्यानंतर काळे व गोरे असे पाच -सहा असे समिकरण जुळवण्यात आले. नेमकं हेच गणित त्यांचे निर्णयाक सामन्यात पराभवाचे कारण ठरत आहे. गोरा कर्णधार असल्यावर कृष्णवर्णीय  खेळाडू हातचे राखून खेळतात तर काळा कर्णधार असल्यावर गोरे खेळाडू आपला हिसका दाखवतात. त्यामुळे द.आफ्रिकेला विश्वविजेते बनण्यात अपयश येत आहे.
                सन २०२२ टि२० विश्वचषकात हॉलंडने द.आफ्रिकेला हरविले व पुन्हा आता त्यांनी तो पराक्रम केला. त्याकडेही संशयाने बघितले जात आहे. दोन्ही स्पर्धात टेंबा बवुमा हा कृष्णवर्णीय कर्णधार होता. तर डच संघात सात द. आफिकन गोरे खेळाडू आहेत, यामुळे द. आफिकन संघातील गोरे खेळाडू पूर्ण क्षमतेने प्रतिकार करत नसल्याने नेदरलँडचे दोनही विजय साकारले आहेत असं विश्लेषकांच मत बनलं आहे.
               वास्तवात काय सत्य आहे हे संबंधितांनाच ठाऊक. मात्र यामुळे क्रिकेट हकनाक बदनाम होत आहे. तेंव्हा वर्णद्वेष, जातीवाद बाजूला गुंडाळून क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले देशहित व राष्ट्रीय एकात्मता जपणे काळाची गरज बनले आहे व तसे प्रत्येकाने साकारलेच पाहिजे.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close