shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणता कर्णधार स्वतःच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वनडेचा विश्वविजेता होणार ?


            तेरावी एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यास आता जेमतेम तीन दिवस शिल्लक आहे.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघ भारतात आले आहेत. 
यावेळी विश्वचषकात दहा संघ सहभागी होत आहेत.  यापैकी आठ देशांचे कर्णधार प्रथमच विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाची धुरा सांभाळतील. सन २०१९ ते २०२३  दरम्यान बरेच स्थित्यंतरे घडले आहेत.  गेल्या वेळी विश्वचषक खेळलेल्या दहा पैकी नऊ संघ यावेळी सहभागी होत आहेत.  सन १९७५ व १९७९ चे चॅम्पियन  वेस्ट इंडिज पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये खेळण्यास पात्र ठरू शकले नाही. यावेळी नेदरलँडचा संघ त्यांच्या जागी खेळणार आहे.
              रोहित शर्मा (भारत), बाबर आझम 
(पाकिस्तान), दासुन शनाका ( श्रीलंका), शाकिब अल हसन (बांगलादेश), हशमतुल्ला शाहिदी (अफगाणिस्तान), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जोश बटलर (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझिलंड), टेंबा बवुमा (दक्षिण आफ्रिका), स्कॉट एडवर्ड्स (नेदरलॅंड) हे दहा खेळाडू आप-आपल्या संघांचे नेतृत्व करणार आहेत. यातील जो संघ जिंकेल त्या संघाच्या कर्णधाराचे हे पहिलेच वनडेचे विश्वविजेतेपद असेल.
             यावेळी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांचे आठ कर्णधार बदलले आहेत.  न्यूझिलंडचा केन विल्यमसन हा एकमेव खेळाडू आहे जो सन २०१९ मध्येही कर्णधार होता आणि यावेळीही तो ही जबाबदारी सांभाळणार आहे.  मात्र दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणे अवघड आहे.  अशा परिस्थितीत टॉम लॅथम नेतृत्व करेल.  विल्यमसन भविष्यातील सामन्यांमध्ये किविज संघात पुनरागमन करेल.
            बांगलादेशचा शाकिब अल हसन १२ वर्षांनंतर कर्णधार म्हणून खेळणार आहे. तो, विल्यमसनशिवाय आणखी एक खेळाडू आहे जो दुसऱ्यांदा विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे.  बांगलादेशने शाकिब अल हसनला कर्णधार बनवले आहे.  बारा वर्षांनंतर तो कर्णधार म्हणून विश्वचषकात खेळणार आहे.  योगायोगाने, गेल्या वेळी त्याने संघाचे नेतृत्व केले तेव्हा या स्पर्धेतील बरेच सामने भारतातही खेळले गेले होते.  अशा परिस्थितीत विल्यमसन आणि शकीब दुसऱ्यांदा वनडे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करतील.
           यावेळी यजमान भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.  सन २०१९ मध्ये विराट कोहलीच्या हाती भारताचे नेतृत्व होते.  त्यावेळी टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली होती.  सन २०२१ च्या अखेरीस रोहित टीम इंडियाचा कर्णधार झाला.  त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सन २०२२ च्या टि २० विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाला.  याशिवाय आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीतही संघाचा पराभव झाला होता.  आता तो यावेळी आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो की नाही हे पाहायचे आहे. सन २०११ पासून यजमान संघांनी विजेतेपद मिळविण्याची परंपरा सुरू झाली आहे, ती रोहित सुरू ठेवतो का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
           इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गेल्या वेळी जेतेपद पटकावले होते.  विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन बनण्यात तो यशस्वी ठरला.  यावेळी मॉर्गन संघात नाही.  त्याच्या जागी जोश बटलर कर्णधार आहे.  बटलरने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात इंग्लंडला चॅम्पियन बनवले होते.  त्यांचा संघ एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून गणला जातो.
            ऑस्ट्रेलियन संघ सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळला होता.  त्यावेळी कांगारूंनी उपांत्य फेरी गाठली होती.  यावेळी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या हाती संघाची धुरा आहे.  आता तो ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी मिळवून देऊ शकतो की नाही हे पाहायचे आहे. त्यांचा संघ पुन्हा एकदा स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो.
             चौव्वेचाळीस दिवस भारताच्या दहा वेगवेगळ्या मैदानांवर रंगणाऱ्या विश्व क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात नेमका कोणता संघ १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील जगातल्या सर्वात मोठया स्टेडियमवर विश्वकरंडक उंचावेल ? ह्या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच मिळेल. 

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close