श्रीरामपूर प्रतिनिधी:
समृद्ध भारताच्या निर्मितीत महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती प्रसंगी श्री. ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की, महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जनतेला सत्याग्रह हा प्रतिकाराचा नवा मंत्र शिकवला. सत्य,अहिंसा व सत्याग्रह ही महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची मूलभूत अंगे होती. महात्मा गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी त्यांनी देशभरात चळवळ सुरू केली. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरित केले. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधी हे आर्थिक आणि राजकीय विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. प्रत्येक खेडे राजकीय दृष्ट्या स्वयंपूर्ण असावे अशी त्यांची ग्रामराज्याबाबतची संकल्पना होती. आपल्या अहिंसात्मक मार्गाने असहकार आंदोलनांनी गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ अधिक मजबूत केली. तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान हा नारा देऊन शेती, शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे देशाला सक्षम बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे कार्य केले. आपल्या समर्पित सेवे दरम्यान लालबहादूर शास्त्री निष्ठा, साधेपणा आणि क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा व तत्वांचा मोठा पगडा होता. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, प्रांताधिकारी सावंत साहेब, मा. नगरसेवक के.सी. शेळके, दिलीप नागरे, रितेश रोटे, काँग्रेस सेवा दलाचे सरवरअली मास्टर, प्रवीण नवले, रावसाहेब आल्हाट, अशोकराव जगधने, सुरेश ठुबे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, युनुस पटेल, नजीरभाई शेख, सनी मंडलिक, राहुल शिंपी, रियाजखान पठाण, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, शब्बीर भाई शेख, संजय गोसावी,अजय धाकतोडे, गणेश काते, गोपाल भोसले, विशाल साळवे, राजेश जोंधळे, शुभम गुजर, श्रेयस रोटे, गौरव गिरमे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

