एकदिवसीय सामन्यांनी विश्वचषक स्पर्धा घ्यायला सुरूवात झाल्यानंतर सन १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियामध्ये भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांची पहिली लढत झाली. त्यानंतर सन २००७ चा अपवाद वगळता हे दोन संघ प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत एकमेकांशी लढले. मात्र त्यांच्यात कधी झुंज झालीच नाही. भारताने सन २०२३ पर्यंत खेळलेल्या आठ स्पर्धात पाकिस्तानचा धुव्वा उडवताना आपले वर्चस्व तर कायम राखलेच मात्र पाक क्रिकेटला ते नेमके कुठे आहेत ? यावर प्रश्नावर विचार करायला पुन्हा एकदा भाग पाडले.
सन २०२३ विश्वचषकाची तर मागील चार वर्षांपासून वाट बघितली जात होती. भारताला विश्वचषकात हरविण्याचे स्वप्न उराशी घेऊन पाकचा संघ जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरला खरा परंतु भारताला हरविण्याचे सोडाच स्वतःची इज्जत राखण्यातही त्यांना यश न मिळाल्याने पाकचा संघ त्यांच्याच मायदेशातील क्रिकेट रसिकांच्या नजरेतून उतरला. विश्वचषकासारख्या मोठया स्पर्धेत एका हाय होल्टेज सामन्यात उतरण्यापूर्वी सर्वांगीन बाबींचा पूर्ण अभ्यास व विचार करून मैदानात उतरावे लागते. शिवाय ज्या भारतासारख्या संघाविरूध्द त्यांच्याच मायभूमित खेळताना हजार वेळा योग्य विचार करावा लागतो हे बाबर आझम अँड फ्रेंडस इलेव्हन उर्फ पाकिस्तान क्रिकेट संघाला अजूनही समजलेच नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला फलंदाजीस आमंत्रित केल्यानंतर सुरूवात नेहमीप्रमाणेच डळमळीत झाली. अब्दुल्ला शफीक व इमाम उल हक चांगल्या सुरुवाती नंतर मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरले तर कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिजवानने डावाला बऱ्यापैकी आकार दिला, त्यानंतर ते तीनशे पार पाकला नेतील असे वाटत असतानाच दोन बाद एकशे पंचावन्न वरून पाकच्या डावाला गळती लागली ती आणखी अवघ्या छत्तीस धावा वाढवून पूर्ण पन्नास षटके न खेळताच भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करून माघारी परतले.
पाकच्या डावाला गळती लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या फलंदाजांची हाराकिरी व बेफिकीर वृत्ती मोठ्या प्रमाणात आहे मात्र खरं कारण म्हणजे भारताशी दोन हात करण्याची, भारतीय गोलंदाजांशी लढण्याची व अथांग अशा निलसागराचा दबाव झेलण्याची मानसिकताच पाकिस्तानी संघात नव्हती. पाकिस्तानचा संघ केवळ बाबर व रिजवान या निव्वळ दोन फलंदाजांवरच अवलंबून आहे. या सामन्यात बऱ्यापैकी खेळून ते दोघे कोसळले आणि पाकच्या डावाचा बोजवाराच उडाला. खरं बघाल तर पाक संघात तथाकथीत अष्टपैलू खेळाडूंचाच भरणा आहे आणि हे अष्टपैलू खेळाडू म्हणजे बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या व शाकिब अल हसन सारखे फलंदाजीत परिपूर्ण व गोलंदाजीत परफेक्ट आहेत असे नाही. त्यामुळे शादाब, नवाज, इफ्तिखार, हसन अली हे फक्त कागदावरचेच अष्टपैलू खेळाडू सिद्ध झाले व प्रत्यक्ष मैदानात त्यांचा बार फुस्का ठरला. त्याची परिणीती पाकचा पराभव व नाचक्की होण्यात झाली.
फलंदाजांनी ठेवलेल्या जेमतेम एकशे ब्या एक्कयान्नव धावांच्या आव्हानाचा बचाव करण्यासाठी पाकची गोलंदाजीही सर्वोत्तम दर्जाची आहे असे काहीच नाही. एक नसिम शहा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि त्यांच्या वेगवान मा-यातील आगच लोप पावली. काही दिवसांपूर्वी हे पाकिस्तानी खेळाडू पाकची वेगवान गोलंदाजी जगातील सर्वात मजबूत गोलंदाजी असल्याचा दावा करत होते. पण आज परिस्थिती वेगळीच दिसते. शाहिन शहा आफ्रिदी निष्प्रभ, हसन अली प्रभावहिन, हारीस रौफ दिशाहिन तर फिरकी मारा करणारे शादाब व नवाज फिरकीची कलाच विसरले. ज्या खेळपट्टीवर भारताचे वेगवान व फिरकी गोलंदाज चमत्कारीक कामगिरी करतात मग पाकचे गोलंदाज त्याच खेळपट्टीवर कमी का पडतात ? त्याचे महत्वाचे कारण म्हणजे दर्जा व परिस्थितीशी जुळवून न घेण्याची संकुचित मानसिकता.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने सांगितलेला एक किस्सा असा की, कोणीतरी पाकच्या प्रमुख गोलंदाजांना एक प्रश्न केला की, भारताचा कोणता फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंड्वर पुलचा / हुकचा फटका मारण्यात तरबेज आहे ? प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर रोहित शर्मा असं दिलं. रोहित शर्मा हे उत्तर माहिती असूनही पाकच्या त्याच गोलंदाजांनी रोहितवर आखूड टप्प्याच्या चेंडूचा भडिमारच केला. त्याचा निकालही आपणास ठाऊक आहे. रोहितने पाच षटकारांसह श्यहाऐंशी धावांची खेळी करून पाकच्या गोलंदाजांच्या अकलेचे तिन तेरा वाजवले.
पाकिस्तानी कर्णधार व संघ मॅनेजमेंट आपली कमजोरी मानतच नाही उलट पडलो तरी नाक वरच या उक्ती प्रमाणे आपल्याच चुका झाकून स्वतःच्या अडचणीत वाढ करून घेत आहेत. पाकचे फिरकी गोलंदाज शादाब खान व मोहम्मद नवाज फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टयांवरही सातत्याने अपयशी ठरत असूनही त्यांनाच संधी दिली जात असल्याने संघा सोबत असलेल्या उसामा मिर या गोलंदाजाची कला तंबूतच कुजवली जात आहे. संघात ज्याची गरज आहे त्याला न खेळवण्याची पाकची आडमुठी वृत्तीच त्यांच्या पिछेहाटीचं कारण ठरत आहे.
भारत -पाक सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत परिस्थितीशी जुळवून घेताना संघाच्या गरजेनुसार खेळ केल्याने दबाव वाढायची वेळच आली नाही उलट पाकचे दबावाचं गाठोडंच माथ्यावर घेऊन मैदानात उतरले, त्यामुळे त्यांची जबाबदारी ते विसरूनच गेले. शिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मा नेतृत्वाच्या गुणात प्रत्येक चालीत सरस ठरत होता तर पाकचा कर्णधार बाबर आझमची प्रत्येक चाल चुकत होती व त्यामुळे पाकची पिछेहाट वाढत गेली. दुसरीकडे फलंदाज म्हणून रोहित व बाबरच्या फलंदाजीवर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की रोहितचा आत्मविश्वास मोठा आहे व संघाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची त्याची मानसिकता आहे. तर त्या उलट बाबरची मानसिकता अप्पलपोटी दिसली, संघाच्या हितापेक्षा स्वत:ची आकडेवारी मोठी करण्यातच त्याला स्वारस्य असल्याचे दिसले. त्याचा परिणाम आपल्यासमोरच आहे. रोहिताचा संघ अव्वल स्थानी पोहोचला तर दोन दुबळ्या संघांना हरवून स्वतःला ग्रेट समजायला लागलेला पाकचा संघ गुणतालिकेतही खाली सरकायला लागला.
एकदंर या सामन्याच्या निकालानंतर विचार केला तर असा निष्कर्ष निघू शकतो की टिम इंडिया "मिशन वर्ल्ड कप विन" या आपल्या उद्देशाकडे अग्रेसर होताना दिसते तर पाकला आपल्या खेळात व धोरणात खरोबर मोठे बदल करावे लागतील. तसे काही त्यांनी केले तरच त्यांची अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची इच्छा फलद्रूप होईल. स्पर्धा मोठी आहे अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे त्यांना सावरायची संधी अजूनही आहे.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
.

