shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासन नियमानुसार सफाई कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या - केंद्रीय सनियंत्रण समिती सदस्य रवींद्र प्रधान


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
 जिल्ह्यातील सफाई कामगारांना शासन नियमानुसार सर्व  सोयी- सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत.  कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत मिळावे. तसेच कामगारांना आरोग्याच्या सेवाही देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश भारत सरकार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या केंद्रीय सनियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र प्रधान यांनी  दिले. 


हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री. प्रधान बोलत होते. 
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे,सहायक आयुक्त राधाकिसन देवढे समन्वयक ॲड. कबीर बिवाल, जनसंपर्क अधिकारी कृष्णा शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समितीचे सदस्य रवींद्र प्रधान म्हणाले, नियमित व कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे वेतन शासनाने विहित केलेल्या दरानुसार मिळणे आवश्यक आहे.  कामगारांचे वेतन नियमानुसार त्यांच्या बँक खात्यामध्येच जमा करण्याबरोबरच या कामगांराच्या वेतनातुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा कपात होईल, यादृष्टीनेही आवश्यक ती काळजी घ्यावी. वेळेत वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तक्रारी येत आहे. या वारसांना शासन नियमानुसार नोकरी देण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होणे आवश्यक असुन त्यासाठी दरमहा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने गमबुट, हॅडग्लोज, साबण, मास्क, सॅनिटायजर, गणवेष आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 
केंद्र शासनामार्फत सफाई कामगारांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा सफाई कामगारांना लाभ देण्यासाठी सफाई कामगारांच्या वस्त्याच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन करत योजनांची माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सदस्यांनीनी साधला सफाई कामगारांशी संवाद

समितीचे सदस्य श्री. प्रधान यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या कामगारांशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्याशी संवाद साधत आपणास दरमहा किती पगार मिळतो, सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व साहित्य मिळते काय, आपल्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्यात येते का, किती तास काम करता आदी बाबींची माहिती त्यांनी यावेळी जाणुन घेतली.
जिल्हाधिकारी सिद्धाम सालीमठ म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधा संदर्भात देण्यात आलेल्या सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येईल.
प्रथम समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
बैठकीस सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सफाई कामगार उपस्थित होते.

*संकलन 
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close