shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पक्षांतर्गत गटबाजीमुळे श्रीरामपुरात वाकचौरे यांचे मताधिक्य घटले


ज्या भागातून मते मिळाली त्या भागाचा विकास व्हावा - मतदारांची अपेक्षा

श्रीरामपूर / प्रतिनिधी 
लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे जवळपास ५० हजाराच्या मताधिक्याने विजय झालेले असले तरी हे मताधिक्य त्यांना अकोले व संगमनेर या दोन तालुक्यातून मिळालेले आहे. इतर सर्व तालुक्यांमध्ये त्यांचे विरोधी उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य आहे. वाकचौरे यांनी शिवसेनेचे तिकीट घेतले मात्र या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मर्यादित असल्याने त्यांची सर्व भिस्त ही मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर होती. नेवासामध्ये शंकरराव गडाख, श्रीरामपूर मध्ये आमदार लहुजी कानडे व करण ससाणे,संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे इत्यादी प्रबळ नेते होते. अकोले,शिर्डी आणि कोपरगाव मध्ये शिवसेना काँग्रेस किंवा शरद पवार राष्ट्रवादीकडे फारसे प्रभावी नेते नव्हते आणि स्वतः वाकचौरे यांची देखील कोणतीही यंत्रणा नव्हती.
अकोले तालुक्यात भूमिपुत्र म्हणून वाकचौरे यांना मोठे मतदान झाले. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे त्यांचा विजय झाला हे मान्य करावे लागेल.
शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांनी निवडणुकीत उडी घेतली.त्यांनी सुमारे ९० हजार मते घेऊनही वाकचौरे विजयी झाले हे विशेष.श्रीरामपुरात दलित मतांचे प्रमाण मोठे असल्यामुळे रूपवतेंना तालुक्यात २२ हजार मते मिळाली.


त्यांना अकोले व संगमनेर मध्ये मिळालेल्या मतापेक्षा ही मते जास्त आहेत.

श्रीरामपूर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असला तरी कानडे - ससाणे वादाने गेली पाच वर्षे या शहरांमध्ये विकासाचे कोणतेही मोठे काम झाले नाही. आमदार लहुजी कानडे यांनी स्वतःची यंत्रणा सक्रिय करीत स्वतः नियोजन करून वाकचौरे यांचा प्रचार केला. त्यासाठी सर्व प्रकारची मदत कार्यकर्त्यांना केली. प्रत्येक गावाचा दौरा केला. शहरातही पदयात्रा केली तसेच मतदानाच्या दिवशी बुथ वाईज पोलिंग एजंट चे नियोजन केले. त्यामुळे शहरात व तालुक्यात वाकचौरे यांना जवळपास ७४ हजार मते मिळाली. काँग्रेस अंतर्गत गटबाजीची छाप संपूर्ण निवडणुकीवर होती.कानडे,ससाणे दोन्ही गटांनी वाकचौरे यांचाच प्रचार केला. मात्र दोन्ही गट एकत्र कधीच आले नाही.एवढेच नव्हे तर निवडणुकीच्या आदल्या दिवशी नियोजनासंदर्भात एका माजी नगरसेवकाच्या घरी झालेल्या बैठकीत वाकचौरे यांच्या समक्ष कानडे व ससाणे यांचे वाद झाल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी एकाने वाकचौरे यांना एक प्रकारचा दम भरल्याचे ही शहरात चर्चिले जात आहे. आम्ही ठरवले तर तुम्हाला निवडून येऊ देणार नाही अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी काही जणांनी वापरल्याचे बोलले जाते. यावरूनच काँग्रेसच्या यंत्रणेने वाकचौरे यांचे काम किती मनापासून केले हे दिसून येते. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी उघडपणे लोखंडे यांचे काम केले. त्यांचे पैसे वाटले. त्यांच्या सभेसाठी माणसं पाठवली व त्यांना मदत केली.तर काहींनी दोन्ही थडीवर हात ठेवून दोघांना मदत केली. या सर्व गोष्टींमुळे वाकचौरे यांना अपेक्षित मते शहरात मिळू शकली नाही.

लोखंडे यांच्या यंत्रणेने मतदारांना आर्थिक रसद पुरवल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते शहरात मिळाली. याउलट वाकचौरे यांचेकडे एक रुपयाही वाटायला नव्हता. स्वयंस्फूर्तीने मतदारांनी मतदान केले.स्वतःच्या गाड्यांवर येऊन मतदान केले. त्यामुळे झालेले मतदान हे महाविकास आघाडीचे मतदान आहे याची जाण वाकचौरे यांनी नेहमी ठेवावी अशी सुद्धा आता मतदारांची अपेक्षा आहे.

या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला साथ दिली.श्रीरामपुरात ही मुस्लिम समाजातील सर्व गट जरी स्वतंत्रपणे काम करीत होते, तरी सर्वांनी एकजूट होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना एक गठ्ठा मतदान केले. मुस्लिम महिला कधी नव्हे त्या भल्या सकाळी घराबाहेर पडल्या. मुस्लिम भागातील सर्व मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांची रांग होती. हे चित्र पहिल्यांदा पाहायला मिळाले आणि या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या वेळी २२ हजाराचे लीड घेणारे लोखंडे यांचे मताधिक्य कमी होऊन साडे अकरा हजारावर आलं. वाकचौरे यांची यंत्रणा फारशी सक्रिय नसताना आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसताना त्यांना शहरातून भरपूर मतदान झाले. 

शिवसेनेचे सुद्धा शहरात दोन गट आहेत. सचिन बडधे यांचा एक गट व संजय छल्लारे यांचा दुसरा गट. परंतु या दोन्ही गटांनी वाकचौरे यांचे काम इमानदारीने केले. शिवसेनेची ताकद तालुक्यात मर्यादित असल्याने त्यांना मर्यादा होत्या.परंतु त्यांनी सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकी मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचेसाठी मोलाचे योगदान दिले आहे हे विसरता येणार नाही.
भाऊसाहेब वाकचौरे आता खासदार झालेले आहेत. मागील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. दिल्लीमध्ये सर्व खात्याच्या कामकाजाची त्यांना माहिती आहे. श्रीरामपूर शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा शहरवासीयांना आहे. रेल्वे संदर्भातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्याचाही फायदा मतदारसंघाला होणार आहे. फक्त त्यांनी श्रीरामपूरात येताना ठराविक ठिकाणी न जाता सर्व ठिकाणी जाऊन जनसंपर्क वाढवावा. त्यासाठी त्यांनी ही जबाबदारी आपले चिरंजीव रोहित वाकचौरे यांच्याकडे द्यावी तसेच शहरांमध्ये संपर्क कार्यालय सुरू करावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

*बेगानी शादी मे . . .*

*मंगळवारी दुपारी वाकचौरे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आमदार कानडे यांचे कार्यालय असलेल्या यशोधन येथे तसेच नगरपालिकेसमोर व मौलाना आझाद चौकात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशेचा गजर करण्यात आला तसेच फटाक्यांची आताच बाजी करण्यात आली. यावेळी एक विशेष चित्र पाहायला मिळाली ते म्हणजे ज्या लोकांनी निवडणुकीच्या दिवशी वाकचौरे यांच्या विरोधात लोखंडेंचे काम केले ते लोक या आनंदोत्सवात नाचायला व गुलाल उधळायला सर्वात पुढे होते याची शहरात मोठी खमंग चर्चा होती.हे दृश्य पाहून मौलाना आझाद चौकात एका जणाने सांगितले कि ये तो बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ऐसी बात हो रही है !*

पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close