*लातूर/ प्रतिनिधी
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे झालेला असल्यामुळे तेथील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास शासनातर्फे ५० लाखांची मदत तात्काळ करावी असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
श्रीकांत मुद्दे म्हणाले की, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका माथेफिरूने विटंबना केलेली होती म्हणून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये दलित युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होते, यावेळी पोलिसांनी सर्वच दलित कार्यकर्त्यांवर अमानवी अत्याचार करून मारहाण करून पोलिसांनी स्वतःच वाहनाची तोडफोड करून वाहनांना आग लावली आणि पोलिसांनीच दहशत निर्माण केलेली होती.
या आंदोलनामध्ये दलित युवकांसोबत भटक्या-विमुक्त समूहातील वडार समाजाचा कार्यकर्ता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा मौजे रामलिंग मुदगड ता. निलंगा जि. लातूर येथील रहिवासी होता तो तरुण धष्टपुष्ट व उंचापुरा असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कस्टडीमध्ये अमानवीय व अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्या पोलिसांच्या अमानुष्य मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी हा शॉकमध्ये जाऊन त्याचे रक्त गोठल्यामुळे त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे. असे प्राथमिक अहवालामधून व वैद्यकीय अहवालातून समोर आलेले आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या जबर मारहाण व अत्याचारामुळे झालेला आहे या घटनेस परभणी येथील पोलीस व प्रशासन जबाबदार आहेत. वास्तविक पाहता पोलीस हे जनतेचे सेवक व सर्वसामान्य जनतेचे रक्षक असले पाहिजेत. मात्र पोलिसांनीच सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार करून अमानुष छळ करीत आहेत, यामुळेच ही घटना घडलेली आहे.
सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर तसेच संविधानाच्या विटंबना करणाऱ्या व्यक्तीस कडक शासन करून त्यास आजन्म कारावास देण्यात यावा तसेच सदरील पोलिसांच्या अमानवी मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला असल्यामुळे परभणी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या घटनेस प्रवृत्त करणारे पोलीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि सदर सर्व पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांस सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी त्याबरोबर पीडित कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी रंगनाथ घोडके साहेब, रमाकांत मुद्दे जिल्हाध्यक्ष, धनाजी आपटे, गणेश धोत्रे, अर्जुन मुद्दे, गोविंद मुद्दे, रवी भांडेकर, शैलेश धोत्रे, महेश गुंजाळ, कृष्णा धोत्रे, साईनाथ बनपट्टे, प्रशांत आलाकुंटे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
१. पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत करण्यात यावी.
२. पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
३. दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
४. सदरील घटनेची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा.
_______________________________________

